फुलांनीच गुंफल्या संसाराच्या माळा

। सायली पाटील । अलिबाग ।
“सतत काम करत राहणे हीच आयुष्याची रीत आहे,
जो थांबला तो संपला हेच जीवनाचे गीत आहे.”

या ओळींचं तंतोतंत अनुकरण करत जसं एखाद्याने आयुष्य जगावं अगदी तसच आयुष्य जगणार्‍या,वडिलांनी सुरू केलेल्या व्यवसायाचा गाडा आजवर ओढत असणार्‍या, आयुष्यातल्या प्रत्येक चढउताराला अगदी हसतमुखाने कवेत घेत त्या प्रसंगांवर मात करणार्‍या एका नवदुर्गेची कहाणी.आयुष्याची घडी अनेकदा विस्कटली पण तरीही न हरता, न खचता सातत्याने संकटांचा सामना करून आजवर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी एकटीने सांभाळणार्‍या अलिबागमधील गोंधळपाडा येथील बबिता सुतार या नवदुर्गेची. गोंधळपाडा येथे राहणार्‍या बबिता सुतार यांच्या वडिलांनी 40-50 वर्षांपूर्वी फुलांचा व्यवसाय सुरू केला होता. आई, वडील,3 बहिणी आणि 1 भाऊ असं त्यांचं छोटंसं कुटुंब. बबिता सुतार यांना अभ्यासाची तशी फारशी गोडी नव्हती पण व्यवसायाची आवड होती. परंतु प्रत्येकाला जसं शिकावसं वाटत तसं त्यांनाही थोडफार वाटत होतं. परंतु घरची परिस्थिती तशी बेताचीच असल्याने इयत्ता सातवीनंतर शाळा सोडून वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षीच त्यांनी वडिलांना व्यवसायात हातभार लावायला सुरूवात केली. हळूहळू व्यवसायातील अनेक गोष्टी त्या शिकत गेल्या. परंतु, बोलतात ना विधीलिखित मोडता येत नाही आणि नियतीपुढे कोणाचंच काहीच चालत नाही. कालांतराने वडील आणि भाऊ दोघांचेही निधन झाले. कुटुंब आणि व्यवसाय दोन्हींचीही जबाबदारी आता बबिता यांच्यावर आली होती. परंतु त्यांनी न डगमगता अतिशय खंबीरपणे व्यवसाय करत त्याच फुलांच्या व्यवसायातून संसाराच्या माळा गुंफल्या. घर सांभाळण्याची संपूर्ण जबाबदारी आता त्यांच्यावर आली असल्याने फुलांचा व्यवसाय मी एकटीने कसा करू? रस्त्यावर दुकान असताना तिथे मी कशी बसू? असा कोणताच विचार न करता त्यांनी आयुष्याशी दोत हात केले. रोजसाठी लागणारी फुलं आणण्यासाठी त्या रोज पहाटे 3 वाजता मुंबईला जातात. कधी-कधी माल गाडीत भरायला हमाल न मिळाल्याने त्या स्वत: 80 ते 100 किलोच्या फुलांच्या गोणी पाठीवर घेऊन गाडीत भरतात. कुटुंबातील कर्ते पुरूष जरी नसले तरीही बबिता या कुटुंबातील रणरागिणीपेक्षा कमी नाहीत. वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी व्यवसायाला हातभार लावण्यापासून ते वडिलांचे छत्र आणि भावाची सावली हरपल्यानंतर गेली 20-25 वर्षे कोणत्याही पुरूषाचा पाठिंबा नसताना त्या एकट्याच हा व्यवसाय सांभाळत कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत.संकटावर मात करुन जीवन जगण्यात मला आनंद मिळतो,असेही त्यांनी नमूद केले.

Exit mobile version