जंजिरा किल्ल्याचे दरवाजे खुले

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड तालुक्यातील राजपुरी येथील ऐतिहासिक जंजिरा किल्ल्याचे दरवाजे अखेर पाच महिन्यांनंतर पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहेत. पावसाळ्यात पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बंद ठेवण्यात आलेला हा किल्ला आता पुन्हा पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. किल्ल्याचे दरवाजे उघडल्याने पर्यटकांसह स्थानिक बोट चालक-मालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

जंजिरा किल्ला हा पावसाळ्यात पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव शासनाकडून बंद ठेवण्यात येतो. या काळात किल्ल्याच्या आतील परिसरात तसेच तटबंदीच्या आजूबाजूला पाच ते सहा फूट उंच गवत आणि झाडेझुडपे वाढली होती. त्यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका निर्माण होण्याची शक्यता होती. किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्यापूर्वी गेल्या दीड महिन्यांपासून परिसरातील स्वच्छता आणि साफसफाईचे काम सुरू होते. हे काम पूर्ण झाल्यानंतर आज किल्ल्याचे दरवाजे पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी कल्याण कुमार झा आणि प्रितेश जाटव यांनी उघडले. यावेळी त्यांनी पर्यटकांचे स्वागत केले. दरम्यान, जंजिरा किल्ला पाहण्यासाठी 15 वर्षांखालील मुला-मुलींना प्रवेश शुल्कातून सूट देण्यात आली आहे, तर 16 वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीसाठी 25 रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. तसेच, पर्यटकांच्या सोयीसाठी ऑनलाइन क्यूआर कोडद्वारे शुल्क भरण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी कल्याण कुमार झा आणि प्रितेश जाटव यांनी दिली.

Exit mobile version