| नवी मुंबई | वृत्तसंस्था |
नवी मुंबईत पालकांनी अभ्यासाचा तगादा लावल्याने सातवी इयत्तेमधील मुलीने घर सोडल्याची घटना घडली आहे. यामुळे पालक आणि पोलिसांची प्रचंड पळापळ झाली. सरतेशेवटी ही लहान मुलगी सुखरुप सापडल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला.
नवी मुंबईच्या नेरुळ परिसरात हा प्रकार घडला. संबंधित मुलगी ही एका नामांकित शाळेत सातवी इयत्तेमध्ये आहे. बुधवारी (दि.14) तिचा गणित विषयाचा पेपर होता. त्यासाठी मुलीचे आई-वडील अभ्यासासाठी तिच्या मागे लागले होते. पालकांच्या या सततच्या धोशाला कंटाळून ही मुलगी चक्क बॅग घेऊन घरातून निघून गेली.
मुलीने घरातून बाहेर पडताना, ‘मम्मी-पप्पा, आय हेट यू’, अशी चिठ्ठी लिहून ठेवली होती. ही चिठ्ठी पालकांच्या हाती लागताच त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले. नेरुळ पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ तपासाला सुरुवात केली. चिमुरडीने घराबाहेर पडताना कोल्ड्रिंक, चॉकलेट आणि पाण्याची बाटली अशा सर्व वस्तू बॅगेत भरल्या होत्या. अखेर रात्री 1 वाजता उलवे येथील एका सोसायटीच्या आवारात ही मुलगी सुखरुप सापडली.