विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती हेच ध्येय: बाळाराम पाटील

दत्तूशेठ पाटील शिक्षण प्रसारक मंडळाचा रौप्य महोत्सव उत्साहात

| पनवेल | प्रतिनिधी |

माजी आमदार दत्तूशेठ पाटील शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या रौप्यमहोत्सव वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात कोकण शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची सुरुवात आज नितलसच्या शाळेपासून करत आहोत, याचा आनंद होतो. विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती हेच ध्येय आहे, असे प्रतिपादन बाळाराम पाटील यांनी केले.

ते पुढे म्हणाले की, या संस्थेची निर्मिती 1995 साली करण्यात आली. शिक्षण म्हणजे प्रगती नसून, त्याचबरोबर विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती करणे हेच खरे उद्दिष्ट ठेवले आहे. या नितलसच्या शाळेची इमारत जुनी झाली आहे, तेव्हा ही इमारत थोड्याच दिवसात नवीन बांधण्यात येणार आहे. आणि, ही शाळा कोकणातील मधू मंगेश कर्णिक यांच्या शाळेसारखी निसर्गाच्या कुशीतील असेल. याबाबत जिल्हाधिकारी किसन जावळे यांच्यासोबत चर्चा झाली आहे.

यावेळी पंढरीनाथ म्हात्रे, डी.बी. म्हात्रे, दत्ता भोपी, नितलस सरपंच संदीप पाटील, सरपंच मदन मते, सतीश धिवर, शाळेचे मुख्याध्यापक विजय म्हात्रे, मनसेचे पनवेल तालुका अध्यक्ष रामदास पाटील, काशिनाथ पाटील यांनी सांगितले की, या गावातील मुली सातवीच्या पुढे शिक्षण घेत नव्हत्या, कारण पुढील शिक्षणासाठी त्यांना पनवेल किंवा कळंबोलीला जावे लागत असे. ही गरज लक्षात घेऊन याच शाळेत दहावीपर्यंत शिक्षण मिळत आहे, याचा आनंद होत आहे.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक विजय म्हात्रे यांनी केले. यावेळी त्यांनी सांगितले, विद्यार्थ्यांचा शिक्षणाबरोबर शारीरिक, मानसिक, बुद्धिमत्ता वाढवणे, हे आमचे ध्येय आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत गीते यांनी केले. यावेळी विविध शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version