चारित्र्यसंपन्न विद्यार्थी घडविणे हे ध्येय- साळुंखे

| वावोशी | वार्ताहर |

विज्ञान-तंत्रज्ञान आणि सुसंस्काराची सांगड घालून चारित्र्यसंपन्न विद्यार्थी घडवणे हे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे ब्रीद असल्याचे प्रतिपादन संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांनी केले आहे. ते नूतन शालेय इमारतीचे उद्घाटन व हस्तांतरण कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.

गोदरेज कंपनीच्या सहकार्यातून ग्रामीण भागातील इंग्रजी शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर आणि गोदरेज अँड बॉईस मॅन्यु. कं. लिमिटेड यांच्या संयुक्तिक प्रयत्नाने वावोशी येथे बांधण्यात आलेल्या नूतन शालेय इमारतीचे उद्घाटन व हस्तांतरण कार्यक्रम प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रशालेच्या प्रांगणात पार पडला.

खोपोली पेण रोड परिसरातील पालकांना आपल्या पाल्यांना खोपोली किंवा पेण शहरात विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवावे लागत आहे. यासाठी त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होत होते. या छत्तीशी परिसरात इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाची गरज लक्षात घेऊन गोदरेज कंपनीने आपल्या सी एस आर कार्यक्रमांतर्गत श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सहकार्याने विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल ची उभारणी केली आहे. हे स्कूल या परिसरातील सुसज्ज आणि सर्व सोयीने युक्त असे बनवण्यात आले आहे. स्टेट बोर्ड इंग्लिश मीडियम पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक वर्ग करण्यात आले आहेत. या प्रशालेत सुमारे 200 पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून यापुढे या भागाची भविष्यातील वाढ आणि औद्योगीकरण वाढत असल्याकारणाने इकडे चांगल्या सी बी एस सी अभ्यासक्रमाची सुरुवात करण्याचा मानस स्वामी विवेकानंद संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. गोदरेजच्या सीएसआर च्या वतीने या प्रशालेत चार प्रशस्त खोल्या बेंच व सर्व फर्निचर पेंटिंग आणि गार्डन खेळाचे साहित्य उपलब्ध करून दिले आहे. या नूतन इमारतीचे उद्घाटन गोदरेज कंपनीच्या सीएसआर प्रमुख अश्‍विनी देव देशमुख आणि अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष साळुंखे यांनी गोदरेजच्या कामाचे कौतुक केले व भविष्यातही श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था व गोदरेज एकत्रितपणे काम करेल असा विश्‍वास व्यक्त केला. सत्यशील चारित्र्य नैतिकता या मूल्यांची आठवण करीत विद्यार्थ्यांना चारित्र्यसंपन्न जीवन जगण्याचे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य एम एम शेरखाने यांनी केले. याप्रसंगी खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयुब तांबोळी यांनी संस्थेला प्रशासनाची सदैव मदत राहील अशी हमी दिली व श्री छत्रपती संकुलातील शिक्षकांचे कौतुक केले. गोदरेजच्या वतीने राजेंद्र पाशिलकर, मधुसूदन मिस्त्री, कैजाद करंजावाला, विनय भगोरिया, रमेश भांडारकर, वशिष्ठ सिंग, प्रफुल्ल मोरे, आरती भांबोरे, तेजश्री जोशी, तानाजी चव्हाण उपस्थित होते. पी एल हाके, एस आर बेडगे, संजय महाजन, एस एस पाटील, एस एम मोरे, व्ही ए ठाकरे, स्वप्नाली जाधव, रायगड विभागातील सर्व शाखांचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रशांत शेळके व प्रा. दीक्षा पेरवी यांनी केले तर तानाजी चव्हाण यांच्या आभाराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Exit mobile version