सरकार खोटं बोलतंय; प्रकाश आंबेडकरांनी दाखवलं पत्र

। शिर्डी । प्रतिनिधी ।

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रतंप्रधान नरेंद्र मोदींसोबत गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक झाली. त्यानंतर, भारताने पाकिस्तानची कोंडी करणारे 5 महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामध्ये, पाकिस्तानची पाणी कोंडी करत सिंधू जल वाटप कराराला स्थगिती दिल्याचे सांगण्यात आले. मात्र, 24 एप्रिल रोजी केंद्रीय सचिवांनी पाकिस्तानला लिहिलेल्या पत्राचा दाखला देत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्‍न उपस्थित केले आहेत. भारताने पाकिस्तानचं पाणी बंद केलेलं नाही, सरकार खोटं बोलतंय, दिशाभूल करतंय, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांना भारत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, अटारी वाघा बॉर्डर 1 मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. यासोबतच, सिंधू जल वाटप कराराला स्थगिती दिल्याचे सांगण्यात आले. मात्र, हा करार रद्द केल्याचं खोटं सांगितलं जातंय, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं. पाकिस्तानला पाणी बंद केल्यासंदर्भाने दिलेलं पत्रच त्यांनी दाखवलं. या पत्रामध्ये कुठेही पाणी बंद केल्याचा उल्लेख नाही. धरणातलं पाणी आम्ही सोडणार नाही, असा कुठेही उल्लेख नाही. याचाच अर्थ इंडस करार भारत सरकारने रद्द केलेला नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. माझ्या भाषेत नरोबा कुंजोबा आणि कायद्याच्या भाषेत स्टेटस्को असं हे पत्र आहे. त्यामुळे जनतेला हे पत्र दाखवलं तर सरकार कुठल्या प्रकारची कारवाई करतंय हे समोर येईल. हा गंभीर मुद्दा असून शासनाने याकडे डोळेझाक करू नये. या सगळ्यात फक्त पाकिस्तानी नागरिकांचा भुसार रद्द करून त्यांना बाहेर काढता येत आहे, एवढीच वस्तूस्थिती असल्याचेही आंबेडकर यांनी म्हटले.

सिंधू जल कराराबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले की, कोणताही करारनामा लगेच रद्द करता येत नाही. त्याच्यासाठी किंमत मोजावी लागते. जे समोर आलं त्यात धरणातील गाळ काढणार, पाणी अडवणार याला 10 वर्षे लागतील, असेही आंबेडकर यांनी म्हटले. पहलगाम हल्ल्यापूर्वी पाकिस्तान आर्मी चीफने केलेलं भाषण महत्त्वाचं आहे. त्यामध्ये त्याने टू नेशन थेअरी मांडली. आपल्या इंटेलिजन्स विभागाने ही माहिती देखील सरकारला दिली. मात्र, त्यावेळी सरकार झोपून राहिलं. कोणत्याही सूचना दिल्या नाही. आज आपलं सैन्य पूर्णपणे तयार आहे. इस पार.. या उस पार. मात्र, पॉलिटिकल लीडरशिपमध्ये ती इच्छा दिसत नाही. त्यामुळे, सरकारमध्ये इच्छाशक्ती व्हावी, यासाठी 2 मे ला हुतात्मा स्मारकासमोर आपण निदर्शने करणार असल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले.

Exit mobile version