श्री भायदेच्या शौर्याला राज्यपालांची शाबासकी

रेवदंडा | वार्ताहर |
दि. 11 जुलै रोजी काशिद पुलाच्या दुर्घटनेत कारमध्ये फसलेल्या कुटुंबियांचे प्रसंगावधानाने दहा वर्षीय श्री भायदे यांनी प्राण वाचवून असीम धैर्याचे दर्शन घडविले. त्याच्या या शौर्याचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवनावर यथोचित मान सन्मान करण्यात आला. यावेळी माजी खासदार संजीव गणेश नाईक यांच्यासह सागर भायदे व कुटुंबिय उपस्थित होते.
ऐरोली सेक्टर 3 येथे वास्तव्यास असलेले सागर मनोहर भायदे त्याच्या मालकीच्या इंस्टीगा कारने मुरूड या गावी मुक्काम करून मुंबईला येत होते. दरम्यान, काशिद येथे छोटा पूल पार करत असताना अचानक तो कोसळला. सागर भायदे यांना काही कळायच्या आतच गाडी पाण्यात दहा-बारा फूट खाली गटागंळ्या खात गेली. अचानक आलेल्या संकटाने भायदे कुटुंबिय घाबरून गेले. सागर भायदे यांच्या पत्नीने गाडीच्या समोरील काच हाताने फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र काच फुटली नाही. मुसळधार पाऊस असल्याने वाहत्या पाण्याचा प्रवाह प्रचंड होता. सागर भायदे यांचा दहा वर्षांचा मुलगा श्रीने प्रसंगाचे गांभीर्य ओळखून कारच्या पाठीमागील काच पायाने जोरदार प्रहार करून फोडली. काच फुटल्यावर सर्वप्रथम श्री बाहेर आला व त्याने कारमधील सर्वांना बाहेर काढले. त्यानंतर झाडाच्या फांदीचा आधार घेत सागर भायदे यांनी श्रीला रस्त्यावर फेकून दिले. श्रीने स्वतःचा तोल सावरत आईवडिलांना वाचविण्यासाठी आरडाओरड सुरू केला. त्यावेळी तेथे जमलेल्या स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सर्वांना बाहेर काढण्यात आले व तेथून ग्रामस्थांनी औषधोपचारसाठी रूग्णालयांत नेले.
सागर भायदे कुटुंबियांवर वेळ आली होती; परंतु श्रीच्या प्रसंगावधानाने व दाखविलेल्या धैर्याने संपूर्ण सागर भायदे कुटुंबिय सहीसलामत बचावले. श्री भायदे याने कठीण परिस्थितीत असीम धैर्य दाखविले, त्याच्या शौर्यानेच भायदे कुटुंबिय मृत्यूच्या जबड्यातून परतले. श्रीच्या या शौर्याचे कौतुक राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवनावर यथोचित मानसन्मान करून केले. यावेळी माजी खा. संजीव नाईक यांच्यासह सागर भायदे व कुटुंबियांची उपस्थिती होती.

Exit mobile version