राज्यपालांनी मराठी माणसाला डिवचले; पदावरुन हटविण्याची सुप्रिया सुळेंची मागणी

। मुंबई । प्रतिनिधी ।
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास मुंबई ही आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यावर विविध स्थरावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर सडकून टीका केली. महाराष्ट्रात तेढ निर्माण करण्याचा राज्यपालांचा कट असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. तसेच त्यांना या पदावरून हटवण्याची मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देशाची आर्थिक राजधानी मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. यानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या वादग्रस्त विधानानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, खा. सुप्रिया सुळे, शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे. मराठी माणसाला डिवचू नका म्हणत राज ठाकरेंनी राज्यपालांना पत्र लिहलं आहे.

राज ठाकरेंचं राज्यपालांना पत्र
आपल्याला इतिहासाबद्दल माहिती नसेल तर बोलत जाऊ नका. राज्यपाल हे एक प्रतिष्ठेचं आणि सन्मानाचं पद आहे. त्यामुळे आपल्याबद्दल बोलताना लोक कचरतात. परंतु आपल्या वक्तव्याने जनतेच्या भावना दुखावल्या जातात. महाराष्ट्रात मराठी माणसानं येथील जमीन आणि मन मशागत करुन ठेवल्यामुळेच इतर राज्यातील लोक इथे व्यवसाय करायला आले आणि येत आहेत ना? दुसरीकडे त्यांना असं वातावरण मिळेल का?, असा सवालही राज ठाकरेंनी राज्यपालांना विचारला आहे.

शिंदे गट राज्यपालांची केंद्राकडे तक्रार करणार
राज्यपालांच्या मुंबईबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिंदे गटाकडून प्रतिक्रिया आली आहे. शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर यांनी कोश्यारी यांचं हे वक्तव्य राज्याचा अपमान करणारं असून याविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्र सरकारकडे तक्रार करणार असल्याची माहिती केसकरांनी दिली आहे.

Exit mobile version