शेतमालाला हमीभाव मिळण्यासाठी राज्यातील ग्रामपंचायती ठराव घेणार

सरपंच परिषदेचा निर्णय
| मुंबई | प्रतिनिधी |

1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित केलेल्या ग्रामसभेत राज्यातील शेतकर्‍यांना दिवसा दहा तास पूर्णक्षमतेने रोज विद्युत पुरवठा करावा आणि शेतकर्‍याने पिकवलेल्या शेतमालाला हमी भाव मिळावा यासंदर्भात ग्रामसभेचे ठराव घेण्याचा निर्णय सरपंच परिषदेने जाहीर केला आहे. त्यामुळे राज्यातील 28 ग्रामपंचायतींमध्ये अशा प्रकारचे ठराव गावकर्‍यांनी एक मताने मंजूर करण्याचे आवाहन सरपंच परिषदेने केले आहे.

सरपंच हा गावातील गोरगरीब शेतकरी कष्टकरी यांचे नेतृत्व करतो. त्यांच्यासोबत उपसरपंच, सदस्य, आजी-माजी ग्रामपंचायत पदाधिकारी विकासकामात मदत करत असतात आणि गावच्या सर्व समाज बांधवांचे प्रश्‍न सरकार दरबारी मांडणं हे सरपंच परिषदेचे कर्तव्य असल्यामुळे महाराष्ट्रदिनी राज्यातील सर्व सरपंच ग्रामस्थांच्या मदतीने वरील दोन ठराव घेण्यात येणार आहेत. याबाबत सरपंच परिषदेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत नुकताच हा निर्णय घेण्यात आला. पारित केलेले ठराव राज्य शासन आणि केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार असून, या दोन मागण्यांवर तातडीने सरकारने अंमलबजावणी करावी, अशी राज्यातील सर्व ग्रामपंचायतींची आग्रही मागणी राहील, असे सरपंच परिषदेच्या विश्‍वस्त कोकण विभाग प्रमुख सुप्रिया जेधे यांनी म्हटले आहे.

Exit mobile version