‘या’ ग्रामपंचायतीच्या सरपंचाने ठेकेदाराच्या संगनमताने चोरले पाईप?


चोरीचा गुन्हा दाखल करण्याची चंद्रकांत कवळे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

मुरुड तालुक्यातील कोर्लई ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच प्रशांत मिसाळ व ठेकेदार यांनी कोर्लई गावामध्ये गटार योजनेचे काम सुरु केले आहे. गटाराचे पाणी जाण्यासाठी नाला न बांधता शासकीय योजनेेतील पिण्याचे पाणीपुरवठा करणारे पाईप चोरुन ते कोर्लई गावच्या गटार योजनेस बेकायदेशीरपणे वापरले आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात चोरीचा गुन्हा तात्काळ दाखल करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत नारायण कवळे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधिक्षक, कार्यकारी अभियंता राजिप, गट विकास अधिकारी पंचायत समिती, मुरुड, जलसंपदा मंत्री यांच्याकडे केली आहे.

कोर्लई ग्रामपंंचायतीचे विद्यमान सरपंच प्रशांत जानू मिसाळ यांनी कोर्लई कोळीवाड्यामध्ये शासनाच्या निधीतून भूमीगत गटार योजना राबविण्याचे काम सुरु केले आहे. गटार योजना ही गावातील/कोळीवाड्यातील सांडपाणी जाण्यासाठी आहे. या योजनेमध्ये गटाराचे पाणी सोडण्यासाठी सिमेंटचे गटार (नाला) न बांधता पाणी पुरवठा करणारे मोठे पाईप वापरले जात आहेत.गटाराचे पाणी सोडण्यासाठी वापरले जाणारे मोठे पाईप हे मुरुडच्या राजवाड्या समोरील असलेल्या ढिगार्‍यातून चोरुन आणले आहेत. हे पाईप शासकीय योजना राबविण्यासाठीचे शासनाचे पाईप होते. ते पाईप मुरुड येथून चोरुन आणून कोर्लई गावालगत असणार्‍या एका खासगी व्यक्तीच्या मालकीच्या जागेमध्ये आजही साठा करुन ठेवलेले आहेत.

शासकीय योजना राबविण्यासाठी मुरुडच्या राजवाड्यासमोर असलेल्या भल्या मोठ्या ढिगार्‍यातून कोणत्याही अधिकार्‍यांची शासकीय परवानगी न घेताच संमतीवाचून अप्रमाणिकपणे चोरुन आणून त्या संबंधित पाईपचा कब्जा हस्तांतरीत केला आहे.गटार योजनेसाठी वापरण्यात येणारे पाईप हे चोरीची मालमत्ता असल्याचे माहित असतानाही ते अप्रामाणिकपणे स्विकारुन गटार योजनेसाठी ठेवून चोरुन आणलेल्या पाईपांचा (मालमत्तेचा) व्यवहारही चालू आहे. तसेच गटार योजनेत वापरण्यात येणारे पाईप हे चोरीची मालमत्ता आहे, हे माहीत असतानाही ते लपवून ठेवण्यासाठी कोर्लई गावच्या एका व्यक्तीने प्रशांत मिसाळ व संबंधित ठेकेदाराला मदत केली.

शासकीय योजनेचे असलेले मोठे पाईप चोरुन आणून ते गटार योजनेसाठी वापरुन गटार योजनेमध्ये भ्रष्टाचार केला आहे. त्याविरोधात गुन्हा दाखल करण्याबाबत तक्रार केली आहे. त्या तक्रारीला न्याय मिळावा हीच अपेक्षा.

– चंदक्रांत कवळे, सामाजिक कार्यकर्ते

Exit mobile version