| खारघर | प्रतिनिधी |
खारघर सेक्टर 40 येथील सिडकोच्या बागेश्री गृहनिर्माण सोसायटी लगत असलेल्या नाल्यात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या गवतामुळे परिसरात विषारी सापांचा वावर वाढला आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पालिकेने तातडीने नाल्याची साफसफाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. रोहिंजन डोंगरातून पावसाळ्यातील पाणी या नाल्यातून तळोजा खाडीकडे जाते, मात्र गेल्या काही महिन्यांपासून नाल्यात गवत व कचरा वाढल्याने तेथे साप, उंदीर, आणि इतर सरपटणारे प्राणी वावरू लागले आहेत. या नाल्यालगतची बागेश्री सोसायटी मोठी असून, 1,788 सदनिका आणि सुमारे पाच हजार रहिवासी येथे वास्तव्यास आहेत. अलीकडेच सोसायटीच्या आवारात विषारी साप दिसल्याची घटना घडली. त्यामुळे महिला व मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रहिवाशांनी सांगितले की, सकाळ-संध्याकाळी सोसायटीच्या आवारात मुले खेळत असतात. अशा वेळी साप दिसल्यास अपघात होण्याची शक्यता आहे. शिवाय, नाल्यातील गवतातून निर्माण होणाऱ्या अस्वच्छतेमुळे डास आणि उंदरांचा प्रादुर्भाव वाढला आहे. उंदीर वाहनांच्या वायरी कुरतडत असून, त्यामुळे आर्थिक नुकसानही होत आहे. तसेच, नाल्याच्या शेजारी अनधिकृत फेरीवाल्यांची गर्दी वाढली असून, रात्रीच्या वेळी टाकावू खाद्यपदार्थ व प्लॅस्टिक फेकला जातो. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महापालिकेकडून अद्याप ठोस कारवाई झालेली नाही.







