माटवण आदिवासीवाडीवर दरडीची टांगती तलवार

ग्रामस्थांचा स्थलांतरासाठी आटापिटा; स्थलांतरण करण्यात प्रशासन अपयशी

पोलादपूर । शैलेश पालकर ।

तालुक्यातील 2005 च्या कोतवाल कोंढवी पाठोपाठ 2021च्या केवनाळे व साखर सुतारवाडीतील दरडबळींनंतर प्रशासनाला पुनर्वसन व स्थलांतरण करण्यासाठी जाग आली होती. दरडबळी होण्याची परिस्थिती उदभवण्यापूर्वीच माटवण आदिवासीवाडी ग्रामस्थांचा स्थलांतरण होण्यासाठी आटापिटा गेल्यावर्षीपसून सुरू झाला आहे. मात्र, अजून प्रशासनाकडून याबाबत कोणतेच सकारात्मक पाऊल टाकण्यात आलेले नाही त्यामुळे ग्रामस्थांच्या मानगुटीवर दरडीची टांगती तलवार असल्याचे दिसून येते

पोलादपूर तालुक्यातील दरडप्रवण तसेच संभाव्य नैसर्गिक आपत्तीच्या गावांच्या संख्येमध्ये वाढ करण्याची आवश्यकता असूनही प्रशासनाकडून रायगड जिल्हा नैसर्गिक आपत्ती निवारण यंत्रणेला विविध गावांची सद्यस्थिती समजावून सांगितली जात नसल्याचे दिसून येत आहे. पोलादपूर तालुक्यातील माटवण महसुली गावातील आदिवासीवाडीमध्ये लगतच्या डोंगरामधून दरडी कोसळण्याचा धोका काही ठिकाणी दरड कोसळण्यास सुरूवात झाल्याने स्पष्ट दिसू लागला आहे. या डोंगराच्या विरूध्द दिशेला एक डबर दगडखाण असून तिथे मागणीनुसार गौण खनिज उत्पादन करण्यासाठी वेळप्रसंगी सुरूंगस्फोटदेखील केले जात असल्याने हा लाल मातीचा डोंगर खिळखिळा झाला आहे. या डोंगरातून लालमातीसोबत आलेल्या दगडांनी घरंगळत आदिवासीवाडीतील लोकवस्तीपर्यंतचा टप्पा गेल्यावर्षीच पार केल्याने या आदिवासीवाडीवर दरडीची टांगती तलवार असल्याचे उघड झाले होते. यानंतर दि. 4 सप्टेंबर 2023 रोजीच्या ग्रामसभेमध्ये या आदिवासीवाडीचे कायमस्वरूपी स्थलांतरण होण्यासाठी ठराव क्रमांक 26 नुसार ग्रामपंचायत माटवणकडून ठराव करण्यात आला. यावेळी सर्व्हे नंबर 124 या गुरचरण जमिनीचा कायमस्वरूपी स्थलांतरणासाठी उपयोग करण्यास ग्रामपंचायतीची कोणतीही हरकत नसल्याचेही या ठरावात नमूद करण्यात आले. माटवण आदिवासीवाडीतील ग्रामस्थांनीदेखील सरपंच माटवण ग्रामपंचायत यांच्याकडे कायमस्वरूपी स्थलांतरण होण्यासाठी निवेदन दिले असून या निवेदनावर 21 कुटूंबांचे अंगठे व स्वाक्षर्‍या आहेत.

पोलादपूर तहसिल कार्यालयाला पाठविण्यात आलेल्या पत्रव्यवहाराच्या अनुषंगाने मंडल अधिकारी राठोड यांनी दरडग्रस्त लोकवस्तीची प्रत्यक्ष पाहणी करून गुरचरण जागेचा अहवाल आदिवासीवाडी ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यासाठी भेटही दिली. यावेळी निवेदनावर स्वाक्षरी व अंगठयाचा ठसा उमटविणारे रोहित वाघे, आकाश मुकणे, बाळा वाघे, वसंत मुकणे, सुरेश मुकणे, भरत पवार, संतोष मुकणे, अना वाघे, दशरथ वाघे, कळी वाघे, नंदा जाधव, इटा मुकणे, निर्मला मुकणे, काया वाघे, सरू वाघे, रंजना पवार, वसंत मुकणे, गौरी मुकणे, कोमल मुकणे, बारकू मुकणे, सिताराम मुकणे व रूमा मुकणे यांनी मंडल अधिकारी राठोड यांच्या भेटीवेळी विस्थापित होण्याची मानसिकता स्पष्ट केली. यावेळी गुरचरण जमिनीवर सुमारे 40 आदिवासी कुटूंबांचे कायमस्वरूपी स्थलांतरण करण्यासाठी अनुकूलता असल्याने शासनाने याकामी तातडीने सहकार्य करण्याचे आवाहन निवेदनाद्वारे आदिवासी ग्रामस्थांनी केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून या डोंगरातून मातीचा ढिगारा भुस्खलन होऊन कोसळला असून काही दगडांनी आदिवासी वाडीतील घरांच्या दिशेने वाटचाल केल्याने या वस्तीवरील भुस्खलनाचा धोका दिसून आला आहे. मात्र, पोलादपूर तहसिल कार्यालयाकडून मंडल अधिकारी यांच्यामार्फत मिळालेल्या अहवालाबाबत शासनाकडे पाठपुरावा झाला आहे अथवा कसे, याबाबत ग्रामस्थांना काहीही समजून आले नसल्याने आता जोपर्यंत दरडीखाली गाडले जाणार नाही तोपर्यंत सरकार आम्हा आदिवासीवाडीतील ग्रामस्थांना स्थलांतरीत करणार नाही, अशी नैराश्यपूर्ण प्रतिक्रिया माटवण आदिवासीवाडी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version