अलिबागचा हापूस अजून झाडावरच

बाजारात मात्र रत्नागिरीचा आंबा; बदलत्या हवामानाने उत्पादन लांबले

| अलिबाग । प्रतिनिधी ।

गेल्या दोन महिन्यांपासून अलिबाग – पेण, अलिबाग रेवदंडा मार्गावर ठिकठिकाणी आंब्यांची दुकाने थाटली आहेत. अलिबागच्या बाजारात रत्नागिरीचा आंबा दाखल झाल्याचे चित्र असून चार डझन प्रमाणे एक पेटी एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपयांनी विकली जात आहे. आंब्याला प्रचंड मागणी वाढल्याने ग्राहकांची आंबा खरेदीसाठी गर्दी होत आहे.

जानेवारी महिना संपल्यांवर अनेकांना आंब्याचे वेध लागतात. आंबा कधी बाजारात येतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहतात. जिल्ह्यातील बाजारात यंदा आंबा लवकरच दाखल झाला. अलिबागसह वेगवेगळ्या ठिकाणी आंबा विक्रीची दुकाने दोन महिन्यांपासून सजली आहेत. नाक्या नाक्यावर व एसटी बस स्थानक भाजी मार्केट व रस्त्यांच्या दुतर्फा आंबे विक्रीसाठी ठेवली जात आहेत. रायगडात आंब्याची लागवड 14 हजार हेक्टर क्षेत्रात आहे.त्यापैकी 12,500 हेक्टर उत्पादनक्षम क्षेत्र आहे.

अलिबागसह अन्य समुद्रकिनारी फिरण्यासाठी येणारे पर्यटक आंबा खरेदीकडे अधिक भर देत आहेत. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या दुकानांसमोर शनिवार व रविवारी सुट्टीच्या दिवशी आंबे खरेदीसाठी गर्दी होत आहे. अनेक वेळा दिवसाला 40 आंब्याच्या पेट्या विकल्या जात असल्याची माहिती विक्रेत्यांकडून दिली जात आहे. सध्या काही ठिकाणी आंब्याच्या आकारानुसार अडीचशे ते तीनशे व चारशे रुपये डझनने आंबा विकला जात आहे. मात्र बदलत्या वातावरणामुळे रायगड जिल्ह्यातील आंबा बाजारात अद्याप दाखल झाला नाही. त्यामुळे रत्नागिरीतील आंबा अलिबागच्या बाजारात विक्रीसाठी ठेवला जात आहे. व्यापार्‍यांकडून आंबा विकत घेऊन स्थानिक व्यवसायिक रत्नागिरीचा आंबा विकत आहेत. चार डझनची एक पेटी पंधरा ते सोळाशे रुपयांना विकली जात असल्याची माहिती आंबा विक्रेत्यांकडून दिली जात आहे.

Exit mobile version