| पेण | प्रतिनिधी |
ग्रुप ग्रामपंचायत कांदळे हद्दितील कांदळेपाडा गावातील सार्वजनिक गटाराचे सांडपाणी जाण्याचा मार्ग बंद केल्याने सांडपाणी अर्ध्या गावामध्ये शिरले असून, रस्त्यावर एक ते दिड फुट पाणी साचले असल्याने, कांदळेपाडा गावातील ग्रामस्थांना ये-जा करणे कठीण झाले असून, दुर्गंधीयुक्त पाण्याचा त्रास कांदळेपाडा ग्रामस्थांना होत असून त्यामुळे गावाचे आरोग्य धोक्यात आले आहे.
या बाबत ग्रामस्थांनी दिलेली माहिती अशी की, 50 ते 60 वर्षापासून कांदळेपाडा गावाच्या सांडपाण्याचा मार्ग हा ठरलेला असून त्या मार्गानेच सांडपाणी मुंबई-गोवा महामार्गाच्या मुख्य नाल्याला मिळतो. परंतु, कांदळेपाडा गावातील सुनिल लांगी या माणसाने गटारामध्ये दगड, विटा, माती टाकून गटार बंद केले असून, त्यामुळे पाणी पुर्ण गावात शिरून रस्त्यावर आले आहे. रस्त्यावर पाणी आल्याने गावातील ग्रामस्थांना ये-जा करणे कठीण झाले असून, या पाण्याला अतिशय घाणेरडी दुर्गंधी येत आहे. त्यामुळे रस्त्या शेजारील घरांमध्ये साथींच्या आजारांना सुरूवात झाली आहे. काही घरांना पुर्ण पाण्याने विळखा दिल्याने नागरिकांना घरातून निघनेही कठीण झाले आहे. या बाबत कांदळे ग्रामस्थांनी पेण तहसील, पेण पंचायत समिती, पेण प्रात्त कार्यालय तसेच वडखळ पोलीसठाण्यात दाद मागण्याचा प्रयत्न केला. परंतु संबंधित प्रशासकीय यंत्रणाने कांदळेपाडा ग्रामस्थांच्या निवेदनाला केराची टोपली दाखवली आहे. या बाबत प्रत्यक्ष भेटून सुनील लांगी यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, सदरील गटार माझ्या जागेतून जातोय सदरील गटाराचे पाणी माझ्या घरात घेणार नाही.
कांदळेपाडा ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात
