उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली; प्रशानाचे दुर्लक्ष

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

जिल्हा सुरक्षा रक्षक गेले तीन दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर न्याय हक्कासाठी उपोषणाला बसले आहेत. त्यापैकी चौघांची प्रकृती मंगळवारी (दि.12) खालावली. ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही त्यांनी उपोषणकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्याची बाब समोर आली आहे. प्रशासनाच्या या आडमुठे धोरणामुळे उपोषणकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून मागणी मान्य होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

उपोषणकर्ते रविंद्र भले, सिकंदर कोळी, समीर म्हात्रे, मयुर माळी या चौघांची मंगळवारी दुपारी प्रकृती खालावली. याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाला दिल्यानंतरही त्यांनी कोणतीही हालचाल केली नाही. जिल्हा रुग्णालय हाकेच्या अंतरावर असतानाही उपोषणकर्त्यांना वेळेवर उपचार न होणे, हे दुर्देवच असल्याची प्रतिक्रिया उपस्थित सहकाऱ्यांनी दिली. बुधवारी वैद्यकिय अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची तपासणी करुन त्यांच्यावर औषधोपचार केले.

Exit mobile version