तपासणीसाठी आलेल्या आरोपींकडून आरोग्यसेविकेला मारहाण

कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील घटना ; आरोग्य कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेविकेला आरोग्य तपासणीसाठी आणलेल्या आरोपींकडून अश्लील शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि. 5) घडली. या प्रकारामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेचा निषेध करीत आरोग्य कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले. या घटनेची तक्रार कर्जत पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, 24 तास बंदोबस्त देण्याची मागणी करण्यात आली आहे.

उपजिल्हा रुग्णालयात दुपारी दीडच्या सुमारास आंतररुग्ण विभागात सहाय्यक अधिसेविका सविता पाटील राऊंडसाठी आल्या होत्या. दरम्यान, तालुक्यातील गारपोली येथील पोद्दार सोसायटीतील हाणामारीच्या घटनेतील जखमी आरोपींना आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात आणण्यात आले होते. दरम्यान, अपर्णा रवींद्र मोरे आणि वरद रवींद्र मोरे यांची वैद्यकीय तपासणी सुरु असताना बाहेरून आलेल्या संगीता रवींद्र मोरे यांनी सविता पाटील यांच्या कानशिलात लगावली. त्यामुळे त्या बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळल्या. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना लागलीच उपचारासाठी दाखल करण्यात आले.

दरम्यान, रुग्णालयात अपघात विभागात कार्यरत असणारे डॉ. मालशेजकर (वैद्यकीय अधिकारी), डॉ. चंदरमुनी मोरे, डॉ. म्हात्रे, शिवानी साळुंखे (अधिपरिचारिका), अश्विनी बाबर (अधिपरिचारिका) या सर्वांना आरोपींनी गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली. या घटनेनंतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले असून, बाह्य रुग्णसेवा बंद केली आहे. उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी कर्जत पोलीस ठाणे गाठले आणि निवेदन दिले. तसेच संगिता मोरे यांच्यावर सरकारी अधिकारी व कर्मचारी यांना दमदाटी करीत मारहाण करुन सरकारी कामकाजात अडथळा निर्माण केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच उपजिल्हा रुग्णालयाला 24 तास बंदोबस्त द्यावा, या मागणीचे निवेदन देण्यात आले. जखमी सविता पाटील यांच्यावर कर्जत येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Exit mobile version