पाच महिन्यांच्या बाळाला जमिनीवर आपटले
| उरण | वार्ताहर |
उरण तालुक्याच्या बोकडविरा येथील एका निर्दयी बापाने पाच महिन्यांच्या चिमुकलीला जमिनीवर आपटून ठार केल्याची घटना रविवारी (दि. 9) रात्रीच्या सुमारास घडली. पती-पत्नीमधील भांडणाच्या क्षुल्लक कारणावरुन निर्दयी बापाने तिचा जीव घेतला. रुही ठाकूर (5 महिने) असे निष्पाप चिमुकलीचे नाव आहे. दरम्यान, आरोपीला बापाला पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.
उरण पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या बोकडविरा येथील खुशीराम ठाकूर असे आरोपी बापाचे नाव आहे. यासंदर्भात रुहीची आई अमृता खुशीराम ठाकूर यांनी उरण पोलिसात तक्रार केली. आरोपी खुशीराम ठाकूर याच्यासोबत अमृताचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले. त्या दोघांना रुही ही पहिलीच मुलगी झाली. खुशीराम नेहमीच दारु पिऊन पत्नीला मारहाण करायचा. तरीही ती लग्नानंतर एकत्र राहिली. त्यामुळे दररोज दोघांमध्ये भांडणे व्हायची.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमृता खुशीराम ठाकूर ही विवाहित महिला आपले पती खुशीराम गजानन ठाकूर यांच्यासोबत बोकडविरा ग्रामपंचायत हद्दीत भाड्याच्या खोलीत काही दिवसांपासून राहात आहेत. अमृता व तिचे पती खुशीराम यांच्यात रविवारी दुपारच्या सुमारास भांडण झाले असता अमृता रुहीला घेऊन शेजारी राहात असलेल्या आपल्या नातेवाईक बिन्नीलाल बुधा राम यांच्या घरी गेली. मात्र, अंगात भूत संचालेल्या खुशीरामने अमृताच्या मागे जाऊन ‘हमारी लडकी दे दो’ असे बोलत मुलगी घेण्यावरून भांडण सुरू केले.
यावेळी आपल्या कुशीत असणार्या रुहीला देण्यास अमृताने विरोध केला असता खुशीरामने रुहीला आईच्या ताब्यातून हिसकावून घेऊन जमिनीवर आपटले. या घटनेत रुहीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ती मरण पावली. या घटनेची माहिती उरण पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी खुशीराम ठाकूर याला ताब्यात घेतले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांच्या मार्गदर्शनाखाली उरण पोलीस अधिक तपास करीत आहेत.