मुरूडमध्ये उन्हाचा तडाखा

जनजीवनावर परिणाम

| आगरदांडा | प्रतिनिधी |

सामान्यपणे दरवर्षी होळीनंतर हवेत उष्णता वाढत असते; परंतु यंदा मुरूडमध्ये फेब्रुवारीच्या मध्यापासूनच उष्णतेच्या झळा वाढत्या आहेत. कडक उन्हामुळे सकाळी, दुपारी बाजारहाट करण्यासाठी येणारे नागरिक घामाघूम होताना दिसत आहेत. उन्हाचे मोठे चटके बसत असून ज्येष्ठ नागरिकांना उष्णतेचा मोठा त्रास होताना दिसून येत आहे. ही उष्णता वेगळीच असल्याचे बुजुर्ग सांगत आहेत. लहान मुलांनादेखील याचा अधिक त्रास होऊ शकतो.

अति उष्णता निर्माण झाल्यास अनेक व्याधी निर्माण होत असतात. सध्या मुरूडचे दुपारी तापमान 36 अंश सेल्सियसपर्यंत वाढत असून, सायंकाळी मात्र, तापमान 27 सेल्सियसपर्यंत खाली येत असल्याने काहीसा दिलासा मिळत आहे. सकाळी नऊ वाजेपर्यंत उष्णता जाणवत नाही. मात्र दुपारपर्यंत उष्णतेचा परिणाम जाणवत आहे. वाढत्या उष्णतेमुळे बर्फ गोळा, लिंबू सरबत, शहाळी, आणि थंड पदार्थांची मागणी वाढल्याचे दिसून येते. समुद्रकिनारी भागात देखील उन्हाच्या झळा जाणवत आहेत. त्यामुळे दुपारी बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत आहे. पर्यटकांची संख्या देखील रोडावली आहे. दुचाकीवरून जाताना रस्त्यावरील उष्णतेच्या झळा तोंडावर असल्याने चालक हवालदिल झाल्याचे दिसत आहेत.

Exit mobile version