मोठी बातमी! सुषमा अंधारेंना घ्यायला आलेले हेलिकॉप्टर क्रॅश

| रायगड | वार्ताहर |

उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घ्यायला आलेल्या हेलिकॉप्टरला अपघात झाल्याची घटना महाडमध्ये घडली आहे. सुदैवाने यामध्ये कोणालाही काहीही इजा झालेली नाही. सुषमा अंधारे आणि हेलिकॉप्टरचा पायलेट दोघेही सुरक्षित आहेत. हे हेलिकॉप्टर नेमकं कशामुळे क्रॅश झाले याची माहिती समोर आलेली नाही.

गेल्या 2 दिवसांपासून सुषमा अंधारे ठाकरे गटाचे रायगडमधील उमेदवार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गितेंच्या प्रचारासाठी रायगड दौऱ्यावर आहेत. रायगडमध्ये 7 मे रोजी मतदान असल्याने शेवटच्या टप्प्यातील प्रचारानिमित्त काल सुषमा अंधारे महाडमध्ये होत्या. आज आदित्य ठाकरेंच्या सभेसाठी सुषमा अंधारे हेलिकॉप्टरने मुरुडला जाणार होत्या. त्यांना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर महाडमधील एका मैदानात उतरत असताना त्याचा अपघात झाला. जमीनीपासून काही फुटांवर असतानाच हेलिकॉप्टरवरील पायलटचे नियंत्रण सुटलं आणि ते खाली पडले. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणीही जखमी झालेले नाही. अपघात झाला तेव्हा सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये नव्हत्या. त्या हेलिकॉप्टरमध्ये बसण्याआधीच हेलिकॉप्टर क्रॅश झाले. हेलिकॉप्टरचे मोठं नुकसान झाले आहे. धुळीचे लोट उडाल्याने हे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याचे प्राथमिक कारण सांगितले जात आहे.

मात्र, अशाप्रकारे अपघात घडण्यासाठी स्थानिक प्रशासन जबाबदार आहे की इतर काही कारणं आहेत याचा शोध घेतला जाणार आहे. सुषमा अंधारे यांचा आजचा नियोजित दौरा कायम राहील, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.

Exit mobile version