टोकियो | वृत्तसंस्था |
टोकियो येथे सुरु असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेदरम्यान कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये रविवारी नव्याने 22 रुग्णांची भर पडली. गेल्या दोन आठवड्यांत पॅरालिम्पिक क्रीडानगरी संबंधित बाधितांचा एकूण आकडा 200 च्या पार गेला आहे. दोन दिवसांत क्रीडानगरीत वास्तव्यास असणारा कुठलाही खेळाडू बाधित सापडलेला नसून, रविवारी सापडलेल्या बाधितांमध्ये 14 कंत्राटदार, पाच स्पर्धेसंबंधी अधिकारी; तर उर्वरित तीन स्वयंसेवक आहेत. संयोजक समितीने 12 ऑगस्टपासून स्पर्धेसंबंधित कोरोनाची आकडेवारी जाहीर करण्यात सुरुवात केल्यानंतर आजपर्यंत एकूण 219 बाधितांची नोंद झालेली आहे. टोकियोसह संपूर्ण जपानमध्ये कोरोना रुग्णांची संख्या विक्रमी वेगाने वाढत असल्याने टोकियोसह अन्य प्रमुख शहरांमध्ये पॅरालिंपिक स्पर्धेच्या समारोपापर्यंत आणीबाणी वाढविण्यात आलेली आहे.