महामार्ग बनलाय मृत्युचा सापळा

जीवघेणे खड्डे, दगड़गोटे, चिखलाने प्रवाशी हैराण
| पाली/बेणसे । वार्ताहर ।

राज्यातले सत्ताधारी बदलले तरी जनतेच्या समस्या मात्र कायम राहतात, हे अनेकदा समोर आले आहे. असाच एक न सुटलेला प्रश्‍न म्हणजे मुंबई गोवा महामार्ग. त्यामुळे सामान्यांना प्रचंड यातना भोगाव्या लागतात. महामार्ग एन एच 66 या पनवेल (पळस्पे) ते इंदापुर या पहिल्या टप्प्याचे चौपदरीकरणाचे काम मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. अशातच सध्या महामार्गाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. या महामार्गाने आजवर कित्येक निष्पाप जीवांचे बळी घेतले आहेत. महामार्गाच्या दुरावस्थेबाबत माध्यमानी सातत्याने व्यथा मांडली आहे. महामार्गावर सुरू असलेल्या रुंदीकरण कामाबाबत आणि पडलेल्या खड्याबाबत जनतेत असंतोषाची लाट आहे. मागील वर्षी गणेशोत्सव उत्सवा वेळी खड्डेमय रस्त्याने चाकरमानी गेले. आतातरी सरकारने महामार्गाकडे लक्ष देऊन प्रवाशांना दिलासा द्यावा अशी जनतेने शासनाकडे विनंती केली आहे.

महामार्गावरील पनवेल, पेण, नागोठणे, माणगाव, महाड़, पोलादपुर येथील जीवघेण्या परिस्थितीचा प्रवाशी, रुग्णांना मोठा फटका बसतोय. मोटारसायकल स्वार यांची तर परिस्थिती अत्यंत बिकट असून त्यांचा प्रवास अक्षरश. मृत्यूच्या जबड्यातून होत आहे. महामार्गावर रस्ता दुरावस्थेमुळे झालेल्या अपघातास सबंधित प्रशासन व ठेकेदाराला जबाबदार धरून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी प्रवाशी जनतेतून केली जात आहे. अनेक ठिकाणी साईडपट्ट्या तसेच रिफ्लेक्टर व पांढरे पट्टे नसल्याने वाहनचालकांना रात्रीच्या वेळी वाहन चालवितांना अडथळा येतो. खड्डे बुजविण्यासाठी सातत्याने टाकण्यात येणारी मुरूम व माती यामुळे चिखलाची समस्या अधिक वाढली आहे. रोगापेक्षा इलाज भयंकर अशी परिस्थिती दिसून येत आहे. पावसामुळे या मार्गावर आता काही ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी हे खड्डे अर्धा फुटापेक्षाही जास्त मोठे आहेत. खड्ड्यात पाणी साचल्याने खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने मोटारसायकलस्वार कोसळण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. तसेच मोठ्या खड्यांमध्ये वाहन आपटून अपघात होण्याचा धोका वाढला आहे. या मार्गावरील प्रवास म्हणजे जणू नौका नयनाचा प्रवास असल्याचा अनुभव येतोय. रुग्णांचे तर हाल होतातच मात्र गर्भवती महिलांची अवस्था अत्यंत बिकट होत आहे. कोकणात विविध पक्षाचे अनेक दिगग्ज व मातब्बर नेते असूनही महामार्गाच्या कामात सुधारणा होत नाही, याबाबत कोकणवासीय जनतेसह पर्यटक, स्थानिक नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

Exit mobile version