| पाली | वार्ताहर |
वाकण-पाली राज्य महामार्गावर पाली अंबा नदी पुलाजवळ दोन्ही बाजूला रस्त्यावर सखल भागात पाणी भरले होते. यामुळे सकाळपासून येथील दोन्ही बाजूची वाहतूक तब्बल सहा तास ठप्प होती. दोन्ही बाजूला वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. तसेच याच मार्गावर बलाप गावाजवळही रस्त्यावर पाणी साचल्याने तेथेही वाहतूक खोळंबली होती. दुपारी एकनंतर पाणी ओसरल्यावर वाहतूक सुरू झाली.
पालीवरून वाकणकडे व वाकणवरून पालीकडे येणारी वाहतूक बंद झाली होती. खासगी वाहने, एसटी बस, ट्रक, टेम्पो आदी मालवाहू वाहने अडकून पडली होती. रविवार असल्याने शाळा, कॉलेज तसेच सरकारी कार्यालयांना सुट्टी असल्यामुळे विद्यार्थी व चाकरमानी या कोंडीतून सुटले. मात्र, इतर प्रवासी व स्थानिक नागरिकांचे हाल झाले. पाली-वाकण मार्गावरच बलाप गावाजवळ वळणावर मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते. या पाण्यातून काही वाहने धोकादायकपणे जात होती. मात्र, छोटी वाहने अडकून पडली होती. नवीन पूल बांधला तरी कसा आणि कशासाठी? असा सवाल जनतेतून उपस्थित होत आहे.