। गडब । वार्ताहर ।
पेण तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील कोलेटी येथे उभारण्यात येणार्या उड्डाणपुलाचा गाळा कमी रुंदीचा ठेवल्याने वरप, पाबळ भागात जाणारी एसटी बंद होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पाबळखोर्यातील तमाम आदिवासी व कुणबी मराठा समाजात तसेच कोलेटी परिसरात तीव्र असंतोष पसरला असून या अन्याया विरुद्ध कोलेटी येथे 8 आक्टोबंर रोजी मुंबई-गोवा महामार्ग रोखून धरणार आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावरील कोलेटी येथे असणारा कमी उंचीचा अरुंद असणार्या उड्डान पुलाची तक्रार शेतफळस, कोलेटी कोलेटीवाडी पाबळ खोर्यातील ग्रामस्थांनी अनेक वेळा केली आहे. तरीदेखील पुलाचे काम करणार्या अधिकार्यांनी हे काम चालू ठेवले आहे. संबंधित अधिकार्यांनी या पुलाची उंची कमी करून त्याचा पाया कमी केल्याने दर पावसाळ्यात या गाळ्यात पुराचे पाणी शिरणार आहे. कारण दर पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे अंबा नदीचे पाणी या गावात शिरते याची जाणीव येथील वृद्ध शेतकर्यांनी देऊनही रस्त्याचे अधिकारी येथील भौगोलिक परिस्थितीचा कोणताही विचार न करता काम करीत आहेत.
या अन्यायाविरुद्ध लढणार्या कोलेटी शेतपळस, पाबळ खोरे विभाग अन्याय निवारण संघर्ष समितीने उभारलेल्या या लढ्याला येथील खार डोंगर मेहनत आघाडी, कुणबी समाज विकास आघाडी, आदिवासी जाणीव जागृती विकास मंच, कष्टकरी महिला आघाडी या संघटनांनी पाठिंबा दिला असून सर्वपक्षीय स्थानिक लोकप्रतिनिधी देखील 8 ऑक्टोबंर रोजी या रस्ता रोको आंदोलनात सहभागी होणार असल्याचे या लढ्याचे संघटक गजानन भोईर यांनी सांगितले.