फुणगुसमधील ऐतिहासिक धर्मशाळा भग्नावस्थेत


। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
संगमेश्‍वर तालुक्यातील फुणगुस येथे ब्रिटिशकालीन इतिहासाची साक्ष देणारी धर्मशाळेला भग्नावस्था प्राप्त झाली आहे. या धर्मशाळेला झाडाझुडपांनी वेढा घातला असून यामध्ये साप, विंचू असे प्राणी वास्तव्य करत आहेत. त्यामुळे या परिसरातून ये-जा करणे पादचार्‍यांची गैरसोय होत आहे. शिवाय आजूबाजूच्या घरांनादेखील धोका निर्माण झाला आहे. या धर्मशाळेच्या जागी अन्य सरकारी इमारत उभारण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थ करीत आहेत.


एकेकाळी खाडी परिसरात राहणार्‍या ग्रामस्थांसाठी जलवाहतूक हा एकमेव पर्याय होता. त्या काळात मोठी व्यापार पेठ आणि प्रसिद्ध बंदर असलेल्या संगमेश्‍वर तालुक्यातील फुणगुस येथे ब्रिटिशकालीन इतिहासाची साक्ष देणारी धर्मशाळा उभारण्यात आली होती. किराणा सामान, कौले, रेशनिंग धान्य घेऊन निघालेली मोठमोठी गलबते फुणगुस बंदरात आल्यानंतर या धर्मशाळेत काही काळ विश्रांती घेत असत. कालांतराने गावोगावी रस्ते झाले आणि जलवाहतूक संपुष्टात आली. भरती-ओहोटीचा ताळमेळ बघता येथे रात्रभर वस्ती करत असत. सोनवी आणि शास्त्री नदीतून गलबते आणि लाँचची वाहतूक बंद झाल्यानंतर या धर्मशाळेत फेरीवाले, भिकारी तसेच गावोगावी फिरून व्यापार करणार्‍यांचे वास्तव्य होऊ लागले. चिरेबंदी असलेली ही धर्मशाळा वर्षानुवर्षे येथे इतिहासाची साक्ष देत होती. 1990 पर्यंत येथे अनेकांचे वास्तव्य होत होते. सन 2000 पर्यंत काही प्रमाणात सुस्थितीत असलेली ही धर्मशाळा दुर्लक्ष झाल्यामुळे ढासळू लागली आहे.

Exit mobile version