माणगावच्या जुन्या टपाल कार्यालयाची दुरावस्था
| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव शहराच्या इतिहासाची साक्ष देणारे आणि एकेकाळी परिसराच्या दळणवळणाचा कणा असलेले जुने टपाल कार्यालय आज अक्षरशः मृतप्राय अवस्थेत पडून आहे. ब्रिटिशकालीन वारसा लाभलेली ही वास्तू आज शासनाच्या अनास्थेमुळे आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे भग्नावस्थेत रूपांतरित झाली आहे. भिंती कोसळलेल्या, छप्पर उडालेले, सर्वत्र झाडेझुडपे आणि वेलींनी वेढलेली ही इमारत पाहून कोणत्याही संवेदनशील नागरिकांचे मन हेलावून जाईल, अशीच स्थिती सध्या येथे आहे.
विशेष म्हणजे, माणगावचे टपाल कार्यालय तब्बल 50 वर्षांपासून भाड्याच्या इमारतीत सुरू आहे. वेळेत स्वतःची इमारत उभी न राहिल्याने आजवर लाखो रुपये शासनाला भाड्यापोटी मोजावे लागले आहेत. हा पैसा जर वेळेवर इमारत उभारणीसाठी वापरला असता, तर आज माणगावला सुसज्ज आणि आधुनिक टपाल कार्यालय उपलब्ध झाले असते, असा सवाल आता उपस्थित होत आहे. सध्या माणगावचे टपाल कार्यालय व उपविभागीय टपाल कार्यालय मोरबा रोडवर, माजी आ. अशोक साबळे यांच्या निवासस्थानाच्या मागील बाजूस असलेल्या दोन मजली भाडेकरू इमारतीत कार्यरत आहे. या इमारतीसाठी दरमहा सुमारे 33 हजार रुपये भाडे दिले जाते. येथून माणगावसह तळा, पाली, म्हसळा आणि श्रीवर्धन या तालुक्यांतील टपाल कार्यालयांचे कामकाज पाहिले जाते. एवढ्या मोठ्या विभागाचा कारभार भाड्याच्या इमारतीतून चालवावा लागणे, ही बाबच शासनाच्या नियोजनशून्यतेचे द्योतक आहे. दरम्यान, जुने माणगाव येथील जिल्हा परिषद मराठी शाळेसमोर असलेले मूळ टपाल कार्यालय सुमारे 15 गुंठे जागेत पसरलेले असून ते पूर्णतः पडीक अवस्थेत आहे.
वड, पिंपळाच्या भल्या मोठ्या वेलींनी ही ऐतिहासिक वास्तू अक्षरशः गिळून टाकली आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना ही ब्रिटिशकालीन वास्तू अस्तित्वात आहे, हेही कळू नये, इतकी ती झाकली गेली आहे. काही ठिकाणी अतिक्रमण झाल्याचेही चित्र दिसून येते. सर्वत्र पाला-पाचोळा, झुडपे आणि भयाण शांतता पसरलेली आहे. या परिस्थितीला जबाबदार कोण, हा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. शासकीय अधिकाऱ्यांची अनास्था आणि लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष यामुळे माणगावचा हा ऐतिहासिक वारसा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, सुमारे 8 वर्षांपूर्वी येथील तत्कालीन पोस्टमास्तर स्वर्गीय बनेश जोशी यांनी या जागेवर नवीन टपाल कार्यालय इमारत उभारण्यासाठी आवश्यक कागदपत्रे मुंबई व दिल्ली येथील मुख्य कार्यालयांना पाठवली होती. त्या अनुषंगाने जागेचे सर्वेक्षणही करण्यात आले होते. मात्र, तब्बल आठ वर्षे उलटून गेली तरी प्रत्यक्षात एकही वीट रचली गेली नाही. याबाबत अधिक चौकशी केली असता, नव्याने प्रस्ताव दिल्ली येथे पाठवण्यात आला असून सध्या निधीच्या प्रतिक्षेत असल्याचे पनवेल येथील टपाल कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, केवळ प्रस्ताव आणि कागदोपत्री हालचालींमध्ये किती वर्षे घालवायची, असा सवाल आता माणगावकर नागरिक उपस्थित करत आहेत.
आधुनिक टपाल कार्यालयाची गरज
ऐतिहासिक वास्तूचे जतन करत, त्या जागेवर तातडीने नवीन टपाल इमारत उभारावी, अशी जोरदार मागणी आता नागरिकांकडून होत आहे. अन्यथा, उद्याच्या पिढीला माणगावचा हा ऐतिहासिक वारसा फक्त छायाचित्रांतच पाहायला मिळेल, हे मात्र नक्की.







