विद्यार्थ्यांनी आत्मसात केले धाडसी खेळ; निसर्गातील रोमांच आयुष्यभर लक्षात राहणार
| माणगाव | प्रतिनिधी |
शौर्य, पराक्रम आणि इतिहासाला उजाळा देणारी माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या सुधाकर नारायण शिपुरकर आणि गणेश यशवंत वाघरे इंग्रजी माध्यमाच्या शाळेची शैक्षणिक सहल विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय पर्वणी ठरली. पाली-खोपोली मार्गावर वसलेल्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान पराक्रमाची साक्ष देणाऱ्या समरभूमी उंबरखिंड येथे अलीकडे ही सहल पार पडली.
उंबरखिंडच्या दरीत पाऊल टाकताच विद्यार्थ्यांच्या डोळ्यांसमोर काळाचा पडदा सरकला आणि जणू 1661 चा ऐतिहासिक दिवस त्यांच्या समोर उभा राहिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आखलेली रणनिती विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आली. इतिहास फक्त पुस्तकात न वाचता, ज्या भूमीत तो घडला, त्या भूमीत उभे राहण्याचा अतुलनीय रोमांच विद्यार्थ्यांनी अनुभवला. अल्प मावळ्यांनी प्रचंड मोघल सैन्य पराभूत केले. 2 फेब्रुवारी 1661 रोजी खानाचे तीस हजार मोघल सैन्य कोकणावर धडक देण्यासाठी सज्ज झाले होते.
शिवरायांनी आखलेल्या योजनेनुसार मावळ्यांनी उंबरखिंडच्या अरुंद मार्गात मोघल सैन्याला अडकवले आणि काही वेळांतच फौज गोंधळून गेली. विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले की, रणनितीने लढली तर संख्या कधीच अडथळा ठरत नाही.नेताजी पालकर हे उंबरखिंडचे अद्वितीय सेनापती होते. या लढाईत छत्रपती शिवाजी महाराजांसह सर्वात महत्त्वाची भूमिका सरसेनापती नेताजी पालकरांची होती. विद्यार्थ्यांना त्यांच्या पराक्रमाची सविस्तर माहिती देताना शिक्षकांनी सांगितले की, नेताजींच्या धडाडीच्या नेतृत्वामुळे मोघल फौजेला जबर धक्का बसला. त्यांची रणगर्जना, मावळ्यांचा वेग आणि प्राणाची बाजी लावून केलेले अद्भुत साहस विद्यार्थ्यांच्या मनात वीरतेची नवीन परिभाषा कोरून गेले. त्यांचा पराक्रम ऐकताना अनेक विद्यार्थ्यांच्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला. धाडसी खेळांनी आत्मविश्वास वाढवला. ही सहल फक्त इतिहासापुरती मर्यादित नव्हती तर शिवरायांचे धाडस, नेताजी पालकरांचे साहस, मावळ्यांचा त्याग आणि मातृभूमीवरील निष्ठा उभी राहिली. इतिहासाचा जिवंत धडा शौर्याचा अनुभव नेतृत्वाचे शिक्षण निसर्गातील रोमांच आणि आयुष्यभर लक्षात राहणारी प्रेरणा दिली.
खेळांमुळे आत्मविश्वास निर्माण
विद्यार्थ्यांनी तिरंदाजी प्रथमोपचार कौशल्य धाडसी आणि साहसी खेळ यांची ही प्रेरणा दिली. टीमवर्क आणि नेतृत्वगुण वाढवणारे उपक्रम आणि शौर्याचा मनमुराद आनंद घेतला. या खेळांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नवे आत्मविश्वास निर्माण झाले आणि शौर्य ही फक्त कथा नसून जीवनातील धडा आहे याची जाणीव झाली. उंबरखिंड सहल प्रेरणादायी इतिहासाचे जिवंत विद्यालय ठरली.
