मुरुडचा दोन हजार वर्षांपुर्वीचा इतिहास उलगडणार

। मुरूड/जंजिरा । प्रकाश सद्रे ।
पांढरीशुभ्र वाळू, निळ्याशार पाण्याचे स्वच्छ व सुंदर समुद्रकिनारे, हिरव्यागार नारळ-सुपारीच्या बागा आणि सह्याद्रीच्या कुशीत लपलेल्या मुरुड जंजिरा या पर्यटन क्षेत्राचा इतिहास हा केवळ येथील सिद्दी लोकांच्या, जंजिरा संस्थानाच्या ऐतिहासिक वारशापुरता मर्यादित नाही; तर त्या पलीकडे जाऊन हजारो वर्षे जुन्या धार्मिक व सांस्कृतिक स्थळांबाबतचाही आहे. मुरुडच्या दत्तवाडी येथील पुरातत्व संशोधक प्रितम सुरेश वाळंज यांनी हा इतिहास उलगडण्याचे शिवधनुष्य पेलले आहे.

गेली हजारो वर्षे अंधारात असलेला हा इतिहास उलगडणारा एक शोध प्रबंध प्रितम वाळंज यांनी नुकताच मुंबई विद्यापीठात सादर केला आहे. मुंबई विद्यापीठाच्या पुरातत्व विभागाच्या प्राध्यापिका डॉ.शमिका सरवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रबंध त्यांनी पूर्ण केला आहे.

प्रितम वाळंज, या मुरुड तालुक्यातील मजगाव येथील नज अकादमी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात रसायन शास्त्र या विषयाच्या प्राध्यापिका आहेत. सध्या सेंटर ऑफ एक्सट्रा मुरल स्टडीजमध्ये मुंबई विद्यापीठातून त्या मास्टर इन आर्किओलॉजीचे (पुरातत्व) शिक्षण घेत आहेत. शेवटच्या सेमीस्टरमध्ये त्यांनी हा शोधप्रबंध विद्यापीठात सादर केला आहे. प्रितम वाळंज यांचे प्राथमिक शिक्षण मुरूड नगर परिषद, दत्तवाडी शाळा क्रमांक 5 मध्ये तर माध्यमिक शिक्षण सर एसए हायस्कूल मुरूड येथे झाले आहे.

तालुक्यातील ठिकठिकाणच्या दुर्गम भागातील पुरातन मंदिरे, ऐतिहासिक स्थळांना प्रत्यक्ष भेटी देऊन वयोवृद्ध अनुभवी माणसे, ग्रामस्थ, पुजारी, गुरव व भाविकांशी संपर्क साधून प्रितम वाळंज यांनी हा शोधप्रबंध तयार केला आहे. त्यामुळे मुरुडचा जवळपास दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास सर्वसामान्यांना उलगडणार आहे. लवकरच तो पुस्तक स्वरूपात प्रकाशित करण्यात येणार आहे.

Exit mobile version