गृहविभाग ‌‘पांडू हवालदार‌’ चालवतोय!

हर्षवर्धन सपकाळ यांची घणाघाती आरोप

| मुंबई | प्रतिनिधी |

महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली असून, खालच्या स्तरापासून मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यापर्यंत हप्ते पोहोचवले जात आहेत. हप्तावसुलीमुळे पोलीस प्रशासनावर कोणाचाही वचक राहिलेला नाही, म्हणूनच राज्यात ड्रग्जचा खुलेआम काळाधंदा सुरु आहे, गांजा विकला जातो, हातभट्ट्या व विषारी दारुने थैमान घातले आहे. या अवैध धंद्यातूनच पुण्यात विषारी दारुने 22 निष्पाप लोकांचे बळी घेतले आहेत. राज्याचा गृहविभाग ‌‘पांडू हवालदार‌’ चालवत असल्यामुळेच सगळीकडे बेबंदशाही माजली आहे, असा घणाघाती आरोप करत देवेंद्र फडणवीस यांनी याचे प्रायश्चित घेऊन राज्याला पूर्णवेळ सक्षम गृहमंत्री द्यावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, पुण्यात विषारी दारुने 22 जणांचा बळी घेतल्यानंतर सरकारला जाग आली असून, हातभट्या तोडण्याची कारवाई केली जात आहे. या हातभट्ट्या काही रात्रीतून उभ्या राहिलेल्या नाहीत. राज्यात 500 शहरे व 43 हजार गावखेडी आहेत, या ठिकाणी अवैध धंदे व हातभट्या राजरोस सुरु आहेत. गुजरातचे महाराष्ट्रात येणारे ड्रग्ज, जामतारा सारखे प्रकरण व अवैध धंद्याचे रॅकेट राजरोस सुरु असून त्याला गृहविभागाचा आशिर्वाद आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांचे ‌‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रिद वाक्यच बदलले आहे. पुण्यातील प्रकरणाने सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात असल्याने स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी आता कारवाईचे नाटक केले जात आहे.

Exit mobile version