डॉक्टरच्या सतर्कतेमुळे वाचले घोड्याचे प्राण

। माथेरान । वार्ताहर ।
माथेरानमध्ये पशुधन विकास अधिकार्‍याने प्राण्यांमधील दुर्मिळ आजार असलेल्या हर्निया या आजारावर शस्त्रक्रिया करून त्या घोड्याला जीवदान दिले आहे. घोड्याची नसबंदीसाठी तपासणी करत असताना हा घातक आणि दुर्मिळ आजार समोर आल्यानंतर यशस्वी शस्त्रक्रिया केली.

ज्याप्रमाणे माणसाला आजार होतात त्याप्रमाणे प्राण्यांना सुद्धा घातक आजार होतात याची प्रचिती माथेरान मधील पशु वैद्यकीय दवाखाना श्रेणी 1 मध्ये आली.घोडा शांत रहावा यासाठी घोड्यांची नसबंदी केली जाते.असाच येथील अश्‍वचालक अनिकेत बनसोडे याचा घोडा नसबंदी करायची असल्याने दवाखान्यात तपासणीसाठी नेला असता येथील पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.अमोल कांबळे यांनी त्याची तपासणी केली.

तपासणीअंती त्या घोड्याला प्राण्यांमधील हर्निया या दुर्धर आजाराने ग्रासले आहे असे समजल्यावर डॉ.कांबळे यांनी क्षणाची विलंब न करता औषधांची जमवाजमव केली. यावेळी स्थानिक अश्‍वपाल संघटनेचे सचिन पाटील हजर होते.घोड्याला सावरण्यासाठी आठ,दहा अश्‍वचालक आले.दवाखान्यात डॉक्टरांनी सर्व तयारी पूर्ण करून त्या घोड्याची नसबंदी आणि हर्नियाची यशस्वी शस्त्रक्रिया केली. आज हा घोडा तबेल्यात चांगल्या स्थितीत असल्याचे अनिकेत बनसोडेंकडून सांगण्यात आले.

Exit mobile version