बीपीसीएल विरोधात उपोषण सुरुच

| उरण | वार्ताहर |

बीपीसीएलसाठी जमीन संपादित करुनही अद्यापपर्यंत नोकरी न मिळाल्याने भेंडखळ येथील प्रकल्पग्रस्त अविनाश रमण ठाकूर यांनी गेल्या आठ दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरु केलेले आहे. उपोषणाचा 8 वा दिवस असूनही बीपीसीएल प्रशासनाने तसेच उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनीही या महत्वाच्या समस्याकडे पाठ फिरविल्याने तसेच एकदाही उपोषण कर्त्याची भेट घेतली नसल्याने प्रकल्पग्रस्तामध्ये तीव्र संतापाचे वातावरण पसरले आहे.

उपोषणाकडे प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ठाकूर यांनी केले आहे. अविनाश ठाकूर यांचे उदरनिर्वाहाचे साधन शेती होती. ती कंपनीला दिली. आता उपजिविकेचे कोणतेच साधन उपलब्ध नसल्याने अविनाश रमण ठाकूर यांना बीपीसीएल कंपनी प्रशासनाने नोकरीत सामावून घ्यावे अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे. यासाठी भेंडखळ ग्रामस्थ मंडळाने या आमरण उपोषणाला जाहिर पाठींबा दिला आहे. तसेच तब्येत बिघडल्याने इंदिरा गांधी शासकीय ग्रामीण रुग्णालय मध्ये दाखल करण्यात आले आहे. माझे जीवाचे काही बरे वाईट झाल्यास बीपीसीएल कंपनी व महाराष्ट्र शासन यास जबाबदार राहील असे अविनाश ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

Exit mobile version