। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
सावर्डेतील कात कंपनीविरोधात परिसरातील सात गावांतील लोकांनी स्वातंत्र्यदिनी सुरू केलेले साखळी उपोषण सलग सातव्या दिवशी सुरू आहे. प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू असूनदेखील प्रशासनाने अद्याप कोणतीही दखल न घेतल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच, प्रदूषण नियंत्रण मंडळानेदेखील कोणतीच दखल घेतलेली नाही. यामुळे आगामी काळात हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.
सावर्डे परिसरातील कापशी नदीकिनारी बसलेले सावर्डे, दहिवली, कोंडमळा, आगवे, मार्डकी, ओमळी, ढोक्रवली आदी गावांना कात कंपनीच्या प्रक्षित पाण्याचा फटका बसत आहे. याविरोधात स्वातंत्र्यदिनापासून येथील ग्रामस्थांनी प्रांत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. गेल्या 12 वर्षांपासून कात कारखान्यातून सोडण्यात येणार्या सांडपाण्यामुळे परिसरातील नदी, ओढे, विहिरी प्रदूषित झाल्या आहेत. येथील लोकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
याविषयी सावर्डेतील ग्रामस्थ सुरेश भुवड यांनी माहिती देताना सांगितले की, या प्रदूषित पाण्याविषयी आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत कात कंपनीच्या मालकासमवेत फेब्रुवारी महिन्यात बैठक झाली होती. या बैठकीत दोन महिन्यांत कात कंपनी परिसरात जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येईल, असे कंपनी व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले होते. मात्र, गेल्या सहा महिन्यांत जलशुद्धीकरण केंद्र उभारलेले नाही. येथील ग्रामस्थ प्रदूषण विरोधात वर्षानुवर्षे झगडत आहेत. मात्र, त्याची दखल घेतली जात नाही. सातही गावांमधील प्रक्षित काळसर रंगाचे पाणी सोडले जात असल्याने ग्रामस्थ आक्रमक झाल्याने हे उपोषण करावे लागले.