खेडमधील उपोषणांना स्थगिती

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

खेड शहरासह ग्रामीण भागातील 22 जणांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी संबंधित खात्यांविरोधात 15 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषण छेडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या पार्श्‍वभूमीवर तहसीलदार सुधीर सोनावणे यांनी सोमवारी (दि.14) संबंधित खात्याच्या अधिकार्‍यांसह उपोषणकर्त्यांशी केलेल्या चर्चेअंती 6 जणांनी उपोषण मागे घेतले आहे. तर, 13 जण उपोषणावर ठाम आहेत.

यावेळी आंजणी ग्रामपंचायत व भूमी अभिलेख कार्यालयाविरोधात सुनील रामचंद्र घाणेकर यांनी पुकारलेले आत्मदहन स्थगित केले. लोटे-परशुराम औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांना पडलेल्या खड्डेप्रश्‍नी लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनने पुकारलेले उपोषण मागे घेतले. महाराष्ट्र कंपनी मर्यादित लोटे उपविभागाविरोधात कोतवली-टेप भोईवाडीतील सुनील सखाराम जाधव तसेच कळंबणी उपजिल्हा रुग्णालय व तालुका आरोग्य अधिकार्‍यांविरोधातील कळंबणी बुदुक ग्रामस्थांनीही उपोषण मागे घेतले. निलंबित पोलिसपाटील प्रशांत भोसले यांच्यावर कडक कार्यवाहीसाठी खोपी-तांबड मधलीवाडीतील प्रभाकर गंगाराम चव्हाण यांनीही उपोषण स्थगित केले. तसेच, सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेविरोधात सहकारी गृहनिर्माण संस्थेने व शरद सहकारी गृहनिर्माण संस्थेनेही उपोषण रद्द केले.

यावेळी तहसीलदारांच्या दालनात झालेल्या बैठकीप्रसंगी पोलिस निरीक्षक नितीन भोयर, नायब तहसीलदार लक्ष्मीकांत सिनकर, नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी नागेश बोंडले, पंचायत समितीचे लोंढे यांच्यासह महावितरण कार्यालय, कळंबणी रुग्णालय व चाकाळेचे ग्रामविकास अधिकारी आदी प्रतिनिधी उपस्थित होते.

Exit mobile version