| जालना | प्रतिनिधी |
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मागील 10 दिवसांपासून मनोज जरांगे यांनी उपोषण सुरु केले आहे. दरम्यान, चार दिवसांपूर्वी त्यांनी आपण सरकारला चार दिवसांची वेळ देत असून, त्यानंतर पाणी आणि उपचार घेण्यास त्याग करणार असल्याचा इशारा दिला होता. मात्र चार दिवसात आरक्षणाच्या मुद्यावर कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे आपण उद्यापासून पाणी आणि उपचार घेण्यास त्याग करणार असल्याची माहिती मनोज जरांगे यांनी दिली आहे.
मराठा आरक्षणासाठी गेले अकरा दिवस आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सरसकट सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या आपल्या मागणीवर आपण ठाम असल्याचे त्यांनी शनिवारी स्पष्ट केले. आंदोलकांवर लाठीमार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी रात्री मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. ती सुमारे दीड वाजेपर्यंत सुरू होती. या बैठकीत मनोज जरांगे यांचे एक शिष्टमंडळ देखील उपस्थित होतं. शिष्टमंडळाचे म्हणणं ऐकून घेत सरकारने काही बदल करण्यास सहमती दर्शवली होती. पण त्याचा उपयोग झाला नाही.
गेल्या शनिवारी आंदोलकांवर लाठीमार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर अजूनही कारवाई करण्यात आलेली नाही. फक्त सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. आमच्यावर गोळ्या झाडणारे अधिकारी फिरत आहेत, अशी टीका जरांगे यांनी केली. आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.