पत्नीसह मुलीची हत्या करून पतीने स्वतःला संपवले

| जळगाव | वृत्तसंस्था |

पत्नीचा आणि नऊ महिन्यांच्या मुलीचा निर्घृण हत्या करत पतीने विहिरीमध्ये उडी मारून स्वतःही आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना जळगाव जिल्ह्यात घडली आहे.

जामनेर तालुक्यातील देऊळ गाव गुजरी येथील पोलीस पाटील राजेंद्र इंगळे यांची विवाहित मुलगी प्रतिभा झनके या पतीशी पटत नसल्याच्या कारणावरून तिच्या नऊ महिन्याच्या मुलीसह आपल्या माहेरी राहत होत्या. पत्नी सासरी नांदायला येत नसल्याचा राग पतीच्या मनात होता. याच रागात पती विशाल झनके हा पत्नीला भेटीसाठी तिच्या माहेरी आला होता. यावेळी घरात कोणी नसल्याने या दोघांमध्ये काय वाद झाला हे समजू शकले नाही.

घरातील मंडळी काही वेळानंतर घरी परत आले. यावेळी त्यांना प्रतिभा झनके आणि तिच्या नऊ महिन्याच्या मुलीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला, तर जवळच्या एका विहिरीत त्यांचा पती विशाल झनके याचा मृतदेहही आढळून आल्याने या घटनेत आपल्या पत्नी आणि मुलीची हत्या करून पतीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. कौटुंबिक वादातून एक संपूर्ण कुटुंब बेचिराख झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.

Exit mobile version