दुर्गेची मूर्ती साकारण्याची लगबग

बंगाली कारागिरांकडून मूर्तीकामाला वेग

| खांदेश्वर | प्रतिनिधी |

पुढील रविवारी घटस्थापनेने नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार असली, तरी बंगाली समाजाच्या दुर्गापूजेची तयारी आतापासूनच जोरात सुरू झाली आहे. बंगाली समाजात पंचमीच्या दिवशी माँ दुर्गेची स्थापना करून उत्साहात पूजा-अर्चा केली जाते. त्यासाठी नवीन पनवेल येथील माँ काली माता मंदिर परिसरात दुर्गामूर्ती साकारण्याच्या कामाला वेग आला आहे.

माँ दुर्गेची भव्य मूर्ती घडविण्यासाठी बंगाली कारागीर विशेष पद्धतीने मूर्तीकाम करीत आहेत. मूर्तीच्या निर्मितीसाठी बांबू, माती यांसह विविध साहित्याची आवश्यकता असते. या मूर्तीसाठी खास माती कलकत्त्याहून आणली जाते. या मातीत स्थानिक पातळीवर उपलब्ध माती मिसळून मूर्ती घडविण्याची पारंपरिक पद्धत कारागीरांकडून जपली जात आहे.

दुर्गामूर्तीच्या सांगाड्यासाठी लागणारे बांबू आणि इतर आवश्यक साहित्यही कलकत्त्याहून आणले जाते. पारंपरिक पद्धतीने आधी बांबूचा सांगाडा तयार करून त्यावर मातीचे थर देत मूर्तीला आकार दिला जातो. त्यानंतर मूर्तीच्या चेहऱ्यावरील भाव, हातातील शस्त्रे, वस्त्रालंकार आणि रंगकाम अशा विविध टप्प्यांतून माँ दुर्गेचे रूप साकारले जाते. मूर्ती घडविण्याच्या प्रत्येक टप्प्यात कारागिरांची कलाकुसर पाहायला मिळत असून, मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. पंचमीच्या दिवशी माँ दुर्गेची विधिवत स्थापना झाल्यानंतर बंगाली समाजाकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

Exit mobile version