। परभणी । प्रतिनिधी ।
परभणी व बीड जिल्ह्यातील दुर्दैवी घटनांनी संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. या घटनांबद्दल तातडीने कारवाई होणे गरजेचे असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते खासदार शरद पवार यांनी शनिवारी (दि..21) परभणीत आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे.
यावेळी शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना परभणी दौर्यापूर्वी या संदर्भात कठोर पावले उचलण्याचा सल्ला दिला आहे. तसेच ते पुढे म्हणाले की, या दोन्ही घटना अत्यंत दुर्दैवी आहेत. अशा घटनांमुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होते. या घटनांवर राज्य सरकारला वस्तूस्थितीची जाणीव करून देणे आवश्यक आहे, आणि त्यासाठी आम्ही चर्चा करू. या घटनांमुळे महाराष्ट्रात अस्वस्थता पसरली असून या संदर्भात गंभीर विचारमंथन व तातडीने उपाययोजना करने आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तसेच, शरद पवार यांनी या घटनांबद्दल राज्य सरकारने तातडीने लक्ष घालावे व संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
या पत्रकार परिषदेला खासदार निलेश लंके, फौजिया खान, माजी आमदार अॅड. विजय गव्हाणे, तहेसीन अहेमद खान, माजी आमदार सुरेश वरपुडकर, सुरेश देशमुख, विजय भांबळे, बाबाजानी दुर्राणी, भगवानराव वाघमारे, नदीम इनामदार, बाळासाहेब देशमुख, प्रा.किरण सोनटक्के, डॉ. अनिल कांबळे, रमाकांत कुलकर्णी, बाबुराव घाटुळ यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.