खोपोलीत उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद
। खोपोली । प्रतिनिधी ।
परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली आहे. दरम्यान, पोलिसांच्या कोठडीत असलेल्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेचे पडसाद राज्यात उमटले असताना फुले, शाहू, आंबेडकर विचारमंचच्यावतीने बंदचे अवाहन करताच खालापूर तालुक्यात विविध ठिकाणी उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळण्यात आला होता. यावेळी निषेध रॅलीचे आयोजन देखील करण्यात आले होते.
खोपोली शहरात फुले, शाहू, आंबेडकर विचारमंचाच्यावतीने मंगळवारी (दि.17) डिसेंबर रोजी कडकडीत बंद पाळण्यात आला होता. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला अभिवादन करून खोपोली शहरातील मुख्य बाजारपेठेतून निषेध रॅली काढण्यात आली होती. या रँलीत फुले, शाहू, आंबेडकर विचारमंचाचे पदाधिकारी तसेच शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)व शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. तसेच, पुरोगामी विचाराचे नेते व आंबेडकरी जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती.
खोपोली शहरातून परभणी शहरातून निषेधार्थ काढण्यात आलेली रॅली सोमजाईवाडी, खालाची खोपोली, मुख्य बाजारपेठेतून पुढे जात दिपक चौकात ठिंय्या मांडून घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासमोर रॅलीची सांगता करण्यात आली. दरम्यान, या निषेध रॅलीत ‘बोल तरूणा हल्लाबोल, फडणवीस पे हल्लाबोल’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
यावेळी, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खोपोली शहर महिला अध्यक्षा सुवर्णा मोरे यांनी परभणीत आंबेडकरी विचाराचे लोक मोठ्या प्रमाणात असताना पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था न राखता आंदोलन कसे चिघळले? असे केल्यामुळचेे सोमनाथ यांचा बळी गेल्याचा निषेध त्यांनी केला आहे. तसेच, समाजात तेढ निर्माण करणार्या घटना घडत असताना शासनाने पूर्ण जबाबदारी घेतली पाहिजे, काही बांधवांवर लाठी हल्ले होत असतील तर गृहखाते काय करत आहे, असा सवाल शेतकरी कामगार पक्षाचे खालापूर तालुका चिटणीस किशोर पाटील यांनी विचारत संबंधितांची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
खोपोली शहर बंदसाठी व्यापारी, माजीमार्केट, रिक्षा संघटना यांनी सहकार्य केल्याबद्दल फुले, शाहू, आंबेडकर विचारमंचचे रविंद्र रोकडे यांनी आभार मानले आहेत.