वर्‍हाडी बनून आले आयकर अधिकारी

जालन्यात 390 कोटींची मालमत्ता जप्त


। जालना । प्रतिनिधी ।


एखाद्या चित्रपटातील प्रसंगाला शोभेल अशा पद्धतीने वर्‍हाडाचा देखावा करीत आयकर विभागाने जालनामध्ये मोठी कारवाई केली. यामध्ये सुमारे 390 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

वर्‍हाडी बनून आयकर विभागाचे सुमारे 400 अधिकारी 200 वाहनातून जालना येथे पहाटेच दाखल झाले. सर्व वाहनांवर राहुल आणि अंजली, दुल्हन हम ले जायेंगे असे स्टिकर लावले होते. त्यामुळे कुणालाच शंका आली नाही. त्या वर्‍हाड्यांनी शहरातील स्टील उद्योग, इलेक्ट्रॉनिक व्यावसायिकांवर छापा मारला. या धाडीत आयकर विभागाकडून 390 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आले. या प्रकरणात संभाजीनगरमधील एक केटरर आणि एका बिल्डरची चौकशी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

जालना येथील स्टील कारखानदारांच्या कारखान्यांवर, घर, कार्यालयांवर तसेच इलेक्ट्रॉनिक व्यावसायिकांच्या मालमत्तेवर आयकर विभागाने ही कारवाई केली. या छापेमारीतच काही दस्तावेज, 32 किलो सोने, 58 कोटी रुपयांची रोख रक्कम अशी एकूण 390 कोटी रुपयांची मालमत्ता आयकर विभागाच्या हाती लागल्याने खळबळ उडाली आहे.

Exit mobile version