| पनवेल | प्रतिनिधी |
नैना प्रकल्पाविरोधात सुरु असलेले बेमुदत उपोषण दहाव्या दिवशी उपोषणकर्त्यांनी मागे घेतले. यावेळी शिवसेना नेते अनंत गीते, उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी राहुल मुंडके, तहसीलदार विजय पाटील, नैना उपायुक्त सुकेशु पगारे, शिवसेना जिल्हासंपर्क प्रमुख बबन पाटील, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, माजी आमदार मनोहर भोईर, माजी आमदार बाळाराम पाटील, नैना समितीचे अध्यक्ष ॲड. सुरेश ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, नारायण घरत, काँग्रेसचे आर.सी.घरत, सुदाम पाटील, शिवसेना विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, दीपक घरत, योगेश तांडेल, कॉम्रेड भूषण पाटील, प्रशांत पाटील, युवासेनेचे पराग मोहिते, शहर प्रमुख यतीन देशमुख, काशिनाथ पाटील, हेमराज म्हात्रे, अतुल म्हात्रे उपस्थित होते.
माजी आमदार बाळाराम पाटील यांनी बोलताना सांगितले की, नैनाविरोधी संघर्ष करीत असताना आम्ही नेहमीच मोठमोठी आंदोलने करीत आलो आहोत. मात्र अनिल ढवळे यांनी सातत्याने नैनाच्या विरोधात आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आणि ते यशस्वी देखील झाले. त्यांच्या प्रत्येक आंदोलनात महिलांचा सहभाग हा त्यांच्या आंदोलनाच्या यशाचे मुख्य कारण बनले आहे. त्यामुळेच यापुढे महिलांनी आपल्या हक्कासाठी असेच पुढे राहिले पाहिजे आणि संघर्ष केला पाहिजे. नैना हटविण्याच्या मुख्य लढ्यात यापुढे शासनाला आपल्यापुढे नमविण्यासाठी आपण वज्रमूठ तयार केली असल्याचे पाटील यांनी सांगितले.
आज ज्यापद्धतीने विधिमंडळात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सभागृह गाजविले आणि नैना प्रकल्पग्रस्त उपोषणकर्त्यांच्या भावनांची कदर केली आहे. ज्या पद्धतीने विधिमंडळात राज्य सरकारच्या मंत्र्यांना सभागृहात आश्वासन देण्याची वेळ आली, या अर्थी आपले हे उपोषण नक्कीच यशस्वी झाल्याची भावना निर्माण होत आहे. येणाऱ्या काळात सरकारने नियोजित बैठकीमध्ये जर दिरंगाई केली तर मात्र सरकारला गराडा घालण्यासाठी आपल्याला सज्ज व्हावे लागेल. यासाठी आपल्याला तयारी करण्याची गरज आहे. यावेळी उपोषणकर्ते अनिल ढवळे यांनी देखील 95 गावातील नागरिक हे न्याय न मिळाल्यास 95 दिवस रस्त्यावर उतरून यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग रोखण्यासाठी तयार असल्याचा इशारा देखील बाळाराम पाटील यांनी राज्य शासनाला दिला.
यावेळी अनंत गीते यांनी शेतकऱ्यांची चेष्टा करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा निषेध व्यक्त करीत शेतकऱ्यांच्या आंदोलनात वापरण्यात आलेल्या शिर्षकामध्ये बदल करताना राज्य सरकारने कितीही हात काढून घेण्याचा प्रयत्न केला तरी आता हे शक्य नाही, म्हणून आता शेतकऱ्यांची विजययात्रा ही राहणार आहे. मात्र यापुढे नैनाची अंत्ययात्रा निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दहा दिवस सुरू असलेल्या आंदोलनामध्ये नैना समितीचे ॲड.सुरेश ठाकूर, माजी आमदार बाळाराम पाटील यांच्यासह महाविकास आघाडी भक्कमपणे उभी राहिली. शेकाप सरचिटणीस जयंत पाटील, विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची बाजू मांडून सभागृहाचे लक्ष वेधून घेतले होते. त्यातच गेले तीन दिवस माजी आमदार बाळाराम पाटील यांनी नागपूर येथे अधिवेशन ठिकाणी जावून नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर नेत्यांनी याविषयाला उपसून काढले. या सर्व आमदारांनी सभागृहात प्रश्न लावून धरल्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून सभागृहातच आश्वासित करण्यात आल्यामुळे उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले.