। माथेरान । वार्ताहर ।
माथेरानच्या डोंगरमाथ्यावर वरुणराजाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे येथील निसर्गसौंदर्य खुलून गेलेले असून या निसर्गसौंदर्याचा नजराणा पाहण्यासाठी तसेच तो कॅमेरात कैद करण्यासाठी पर्यटकांची मोठ्या संख्येने गर्दी होत आहे. तसेच, पर्यटक येथील निसर्गाच्या सानिध्यात वरुणराजाच्या जलधारा अंगावर झेलत भिजून चिंब होण्याचा मनसोक्त आनंद लुटत आहेत.
माथेरान पर्यटनस्थळी पावसाळी पर्यटन जोरदार सुरू असून शनिवार, रविवार बरोबरच मधल्या दिवसांत देखील पर्यटकांचा ओघ सुरूच आहे. मुंबई-पुण्याच्या जवळचे पर्यटनस्थळ असल्याने आणि अनेक भागात पावसात पर्यटन बंद असल्याने पर्यटक माथेरान पर्यटनस्थळाला पसंती देत आहेत. दररोज हजारोंच्या संख्येने पर्यटक शहरात दाखल होत असून शनिवार आणि रविवार पर्यटकांची मांदियाळी पाहवयास मिळत आहे. इको पॉईंट, लुईझा पॉईंट, हनिमून पॉईंट, वन ट्री हिल पॉईंट आणि शारलोट तलाव धबधबा या ठिकाणी पर्यटकांची सर्वात जास्त गर्दी होताना दिसत आहे. तसेच, मुख्य बाजार पेठेतील माधवजी उद्यानात सुध्दा पर्यटकांची गर्दी पहावयास मिळत आहे. पावसात माथेरानमध्ये पर्यटकांचा ओघ वाढत असून येथील हॉटेल व्यावसायिक, लॉज धारक व दुकानदार समाधान व्यक्त करीत आहेत.
जून महिन्यात रेकॉर्ड ब्रेक पर्यटक माथेरानमध्ये दाखल झाले होते. त्याच प्रमाणे आता जुलै महिन्यात देखील दीड लाखांच्यावर पर्यटक माथेरान शहरात दाखल होणार असल्याचे स्थानिक व्यावसायीकांकडून बोलले जात आहे. तसेच, माथेरानच्या डोंगरमाथ्यावर जोरधार जलधारा कोसळत असून दररोज 70 ते 100 मि.मी पावसाची नोंद केली जात आहे. 22 जून रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत 2388 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.