झाडांना खिळेमुक्तीसाठी कामोठेवासीयांचा पुढाकार

प्रत्येक रविवारी झाडांवरील खिळे काढण्याचे काम

| पनवेल | वार्ताहर |

झाडांनादेखील भावना, संवेदना असतात हे सर्वश्रूत आहेत. शाळेत जाणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याने हे शिकले आहे. हे शिक्षण फक्त पुस्तकी असलेले आढळून येते. प्रत्यक्ष जीवनात हे आचरणात आणले जत नाही; परंतु झाडांच्या संवेदना जपणारी काही माणसे आहेत. कामोठ्याच्या एकता सामाजिक संस्थेने हा उपक्रम सुरू केला आहे. पनवेल पालिकेने केलेल्या झाड गणनेनुसार 16 मे 2023 पर्यंत पनवेल पालिका हद्दीत सुमारे सहा लाख 77 हजार 814 इतकी झाडांची संख्या असून प्रत्येक रविवारी झाडांवरील खिळे काढण्याचे काम ही ध्येयवेडी माणसे करीत आहेत.

या संघटनेत शेकडो सदस्य असून त्यांची मासिक बैठक प्रत्येक महिन्याला प्रत्येक सभासदाच्या घरी होते. विविध विषयावर चर्चा केली जाते. वृक्षारोपण सगळेच करतात, ती वाढवतात; परंतु उपलब्ध असलेल्या झाडांना खिळे ठोकून इजा केल्यामुळे संघटनेने हे अभियान सुरू केले आहे. सध्या त्यांचा हा उपक्रम कामोठे वसाहतीपुरता मर्यादित न ठेवता टप्प्याटप्प्याने संपूर्ण पालिका क्षेत्रात झाडावरील खिळे, बॅनर व पिन्स काढण्याचा निर्धार या सदस्यांनी केला आहे. या उपक्रमात अध्यक्ष अमोल शितोळे, डॉ. दशरथ माने, हरीश बाबरिया, मंगेश अढाव, बापू साळुंखे, संतोष चिखलकर, अजित चौकेकर हे भाग घेत आहेत.

नोकरी, व्यवसाय सांभाळत उपक्रम
विविध प्रकारच्या जाहिराती लावण्यासाठी, बॅनर लावण्यासाठी झाडावर राजरोसपणे सर्रास खिळे ठोकले जातात. हे खिळे काढण्याचे काम एकता सामाजिक संस्थेतील ध्येयवेडी माणसे करत आहेत. आतापर्यंत त्यांनी कामोठे वसाहतीमधील सुमारे 50 पेक्षा जास्त झाडांवरील खिळे काढले आहेत. विशेष म्हणजे हे सर्व जण आपली नोकरी-व्यवसाय सांभाळून रविवारी फावल्या वेळेत हे काम करतात. रविवारी सकाळी 8 ते 10 या वेळेत हे काम प्रामुख्याने केले जाते. एखादे झाड वाढण्यासाठी बराच कालावधी जातो. पनवेल परिसरात 100 ते 150 वर्षे असलेली अनेक झाडे आहेत. झाडांना खिळे ठोकल्यामुळे त्यांना इजा होते, त्यांचे आयुष्य कमी होते असे निर्दशनास आल्यानंतर खिळेमुक्त झाड अभियानफ राबवण्याचा निर्णय या संघटनेने घेतला आहे.

झाडांना संवेदना असतात. त्या जपण्यासाठी आम्ही हे अभियान सुरू केले आहे. आज आमच्या संघटनेतील प्रत्येकाला या कामात आवड निर्माण झाली आहे. प्रत्येक सभासदाच्या गाडीत खिळे काढण्याचे साहित्य असते. इतकी रूची या लोकांमध्ये वाढली आहे. पालिका या उपक्रमात आम्हाला सहकार्य करते. या कामामुळे वेगळ्या प्रकारचे समाधान मिळते.

अमोल शितोळे, अध्यक्ष,
एकता सामाजिक संस्था
Exit mobile version