निष्ठेचा श्वास आणि संघर्षाची ओळख
| अलिबाग | प्रतिनिधी |
राजकारणात मोठेपण खुर्चीवरून मोजलं जात नाही; ते मोजलं जातं संकटाच्या वेळी माणूस कुणाच्या बाजूला उभा राहतो यावर. सत्ता जवळ असताना झुकणं सोपं असतं, पण सत्ता दूर असतानाही ताठ मानेनं उभं राहणं हेच खरं नेतृत्व. अशा नेतृत्वाचं जिवंत, चालतं-बोलतं उदाहरण म्हणजे सुरेंद्र म्हात्रे.
सुरेंद्र म्हात्रे म्हणजे केवळ शिवसेनेचे कार्यकर्ते नव्हे, तर बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर अढळ श्रद्धा ठेवणारे अन् निष्ठेला श्वासासारखं जपणारे माणूस आहेत. ही निष्ठा भाषणापुरती मर्यादित नव्हती; ती त्यांच्या प्रत्येक कृतीत, प्रत्येक निर्णयात आणि त्यांच्या संपूर्ण आयुष्यात दिसून आली. मातोश्रीच्या दारात शिवधनुष्याचं तोरण दिसलं, की बाळासाहेब ठाकरे सहज विचारायचे, सुरेंद्र आला होता का? इतकं आपुलकीचं, घट्ट आणि विश्वासाचं नातं फारच विरळा माणसांच्या नशिबी येतं. हे नातं केवळ राजकीय नव्हतं, तर ते भावनिक आणि वैचारिक होतं.
सत्ता गेली, काळ बदलला, राजकारणात वादळं आली; तरीही सुरेंद्र म्हात्रे खऱ्या शिवसेनेसोबत ठाम उभे राहिले. पद, पैसा किंवा आमिष यासाठी त्यांनी कधीही तत्त्वांशी तडजोड केली नाही. रामाचं नाव घेताना ते नेहमी एकवचनीच राहिले; म्हणूनच स्वार्थासाठी पक्ष बदलणं किंवा मतदारांशी गद्दारी करणं त्यांच्या स्वभावातच नाही.
आजच्या राजकारणात कॅमेरे, इव्हेंट्स, रील्स आणि झगमगाटालाच काम समजलं जातं. पण सुरेंद्र म्हात्रेंचं राजकारण ‘शो’ नाही; ते ‘सेवा’ आहे. लोकांच्या अडीअडचणींमध्ये खांद्याला खांदा लावून उभं राहणं हेच त्यांचं राजकारण आहे. आजही अनेक रात्री, कुठलाही कॅमेरा नसताना, कुठलीही प्रसिद्धी नको म्हणत, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना स्वतः हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणारा माणूस म्हणजे सुरेंद्र म्हात्रे. ते पोस्टसाठी नाही, प्रसिद्धीसाठी नाहीतर माणुसकीसाठी जगतात.
त्यांनी चौल, नागाव, रेवदंडा या परिसराचा विकास करताना केवळ सिमेंटच्या इमारती उभ्या केल्या नाहीत; तर मातीशी नातं, निसर्गाची समृद्धी आणि स्थानिक माणसाचा हक्क जपला. विकास, पर्यटन आणि मूलभूत सुविधांच्या बाबतीत त्यांनी नेहमी जनतेसाठी हक्कानं आवाज उठवला, पण आपल्या मुळांशी कधीही तडजोड केली नाही.म्हणूनच आज त्यांच्या सोबत फक्त कार्यकर्ते नाहीत, तर तळागाळात काम करणारी तरुणांची एक भक्कम फौज उभी आहे. कारण तरुणांना झगमगाट नव्हे, तर संघर्ष ओळखता येतो.
पॉश गाड्या, हाय-फाय आयुष्य आणि निवडणूकीपुरतं काम हा सुरेंद्र म्हात्रेंचा स्वभावच नाही. ते कायम लोकांमध्ये आहेत, लोकांसोबत आहेत आणि लोकांसाठीच आहेत.रामाचं नाव ओठांवर ठेवून राजकारण करणारे अनेक असतात; पण रामाचं नाव मनात ठेवून निष्ठेच्या वाटेवर न डगमगता चालणारा माणूस निराळाच. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा पताका कुठलाही गोंगाट न करता, कुठलीही तडजोड न करता जो खांद्यावर घेऊन चालतो तो म्हणजे ओरिजिनल शिवभक्त. म्हणजेच सुरेंद्र म्हात्रे.
