कार्ला येथील समाज मंदिराचे उद्घाटन
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्ष आणि कोळी समाज यांचे अतुट नाते आहे. शेकापक्षासोबत ठामपणे राहणार्या कोळी समाजाचा मला अभिमान आहे. कार्ले येथील एकविरा देवीवर श्रद्धा असणार्या कोळी समाजाची गैरसोय होऊ नये यासाठी आपण आमदार निधीतून कार्ले येथे सभागृह उभारले असल्याचे प्रतिपादन शेकापक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केले.
कार्ले येथे एकविरा मंदिर परिसरात श्री काळभैरव सन्मित्र विकास मंडळ आग्राव पश्चिम पाडा, पंच कमिटी आणि महिला मंडळ तसेच ग्रामस्थ यांच्यामाध्यमातून आ. जयंत पाटील यांच्या आमदार निधीतून भव्य समाज मंदिर उभारण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन झाल्यानंतर आ. जयंत पाटील बोलत होते. यावेळी अलिबागचे माजी उपसभापती संदीप घरत, नागावचे माजी सरपंच नंदकुमार मयेकर, प्रकाश खडपे, राजू डवले, श्री काळभैरव सन्मित्र विकास मंडळ आग्राव पश्चिम पाडा अध्यक्ष कुंदन भगत, माजी उपसरपंच रणजित धरणकर, सुभाष डबरी, समीर अधिकारी, माजी अध्यक्ष राजेंद्र अधिकारी आदींसह पंचकमिटी, ग्रामस्थ उपस्थित होते. आ. जयंत पाटील पुढे म्हणाले की, कोळी समाजाला दिलेल्या शब्दाचे पालन करीत सभागृहाचे आज उद्घाटन पार पडले आहे. शेकापक्ष दिलेला शब्द पुर्ण करते याचे हे उदाहरण असल्याचेही त्यांनी सांगितले. सदर सभागृहाच्या परिसर विकासासाठी ाअणखली निधी उपलब्ध करुन देणार आहोत. कोळी समाजाने एकत्र राहून संघटीत राहिले पाहिजे. त्यामुळेच समाजाचा विकास शक्य होईल. त्यासाठी आपापसात राजकारण करु नका. आग्राव गावातील रस्त्याचे डांबरीकरण देखील लवकरच पुर्ण करणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली. यावेळी कोळी समाजाच्या वतीने आ. जयंत पाटील यांचा सत्कार करुन त्यांना धन्यवाद देण्यात आले.