पाठपुराव्यामुळे भरपाई देण्यास सुरुवात; जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आदेश
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांचा पाठपुरावा आणि जिल्हाधिकारी यांच्या दणक्याने विमा कंपनी तात्काळ कामाला लागली आहे. मंजूर झालेल्या भरपाईची रक्कम आठ दिवसांत देण्यास कंपनीने सुरुवात केल्याची माहिती चंद्रकांत मोकल यांनी दिली.
जागतिक हवामान बदलाचा (ग्लोबल वार्मिंग) परिणाम जाणवत असून वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. तापमान वाढ, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, वादळे अशा आपत्तींमुळे आंब्याचे उत्पादन घटून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना या आपत्तीतून दिलासादायक बाब म्हणजे आंबा फळपीक विमा योजना अर्थात शेतकऱ्यांचे झालेले नुकसान काही अंशी या योजनेतून भरुन निघते. 2024-25 व 2025-26 या दोन वर्षांसाठी रायगड जिल्ह्यासाठी युनिव्हर्सल सॉम्पो इन्शुरन्स कंपनी नेमून देण्यात आली. रायगडच्या शेतकऱ्यांना देखील अत्यल्प विमा भरपाई मंजूर झाली होती. मात्र, स्कायमेटकडील डाटाच्या आधारे ती कमी होती. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या भरपाईवर हरकत घेतली. रायगड जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे यांनी स्कायमेट कडून प्राप्त हवामानाच्या माहितीच्या आधारे पुन्हा तपासणी करुन अचूक विमा रक्कम निश्चित करावी असे पत्र कंपनीला व संचालक नियोजन व प्रक्रिया कृषी आयुक्तालय पुणे यांना दिले.
विमा भरपाई मिळावी म्हणून महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी कृषी आयुक्तालय व संबंधित यंत्रणाकडे पाठपुरावा केला. याची दखल घेत कृषी आयुक्तालयाच्या निर्देशानुसार कोकण विभागाचे कृषी सहसंचालक शिवाजी आमले यांनी दि.17 ऑक्टोबरला ठाणे येथे सर्वसंबंधिताची बैठक आयोजित केली. या बैठकीमध्ये चंद्रकांत मोकल यांच्या सहीत सुप्रिया देशपांडे, राकेश जाधन, भरत साळुंखे, प्रफुल्ल खारपाटील, पंकज जवके आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्याय चंद्रकांत मोकल यांनी सहसंचालक कृषी यांच्या निदर्शनास आणून दिला. याची सहसंचालक कृषी यांनी दखल घेऊन जिल्हास्तरीय समितीची बैठक रायगडचे जिल्हाधिकारी यांनी घेऊन हा प्रश्न सोडविणे बाबत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना सूचना केल्या. रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी गुरूवारी (दि.20) बैठक घेऊन सुचना दिल्या. कोणत्याही प्रकारची कसूर होता कामा नये, याची दक्षता घेण्याचे संबंधिताना जिल्हाधिकारी जावळे यांनी सांगितले. चंद्रकांत मोकल यांच्या पाठपुराव्यामुळे आणि जिल्हाधिकारी यांच्या दणक्याने विमा कंपनी कामाला लागली. आंबा उत्पादक शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाई देण्यास सुरुवात केल्याची माहिती चंद्रकांत मोकल यांनी दिली.







