तीन जिल्ह्यांतील महाविद्यालयांचा समावेश; स्पर्धेत 50 मुले, 30 मुलींचा सहभाग
| तळा | प्रतिनिधी |
मुंबई विद्यापीठ अंतर्गत तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे द.ग. तटकरे महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने कोकण विभागीय आंतरमहाविद्यालयीन क्रॉस कंट्री स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांतील मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेली एकूण 21 महाविद्यालये सहभागी झाली होती. यामध्ये 13 मुलांच्या तर 8 मुलींच्या महाविद्यालयांचा सहभाग होता. यावेळी एकूण 80 खेळाडूंनी सहभाग नोंदविला असून त्यामध्ये 50 मुले व 30 मुली सहभागी होत्या.
या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम मुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी अध्यक्ष चंद्रकांत रोडे यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष मंगेश देशमुख, मुंबई विद्यापीठ कोकण विभागाचे सहसचिव व समन्वयक शशांक उपशेटे, कोकण विभाग समिती सदस्य रामचंद्र कदम, प्राचार्य भगवान लोखंडे, विविध महाविद्यालयातील क्रीडा शिक्षक, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी तसेच स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी क्रॉस कंट्री मुले वैयक्तिक स्पर्धेत प्रथम क्रमांक स्वराज जोशी (चिपळूण), द्वितीय क्रमांक संदीप जोयशी (महाड), तर तृतीय क्रमांक शिवम कुलाल (लांजा) यांनी पटकाविला. मुलींमध्ये प्रथम क्रमांक निशा कुदळे (लांजा), द्वितीय क्रमांक ऐश्वर्या लोंढे (रत्नागिरी) व तृतीय क्रमांक हर्षदा पांचाल (लांजा) यांनी मिळविला. तसेच, संघ अजिंक्यपद मुलींमध्ये प्रथम क्रमांक ए.सी. एस. महाविद्यालय (लांजा), द्वितीय क्रमांक गोगटेजोगळेकर महाविद्यालय (रत्नागिरी) आणि तृतीय क्रमांक डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय (महाड) यांनी पटकविला आहे. तर मुलांमध्ये प्रथम क्रमांक ए.सी.एस. महाविद्यालय (लांजा), द्वितीय क्रमांक गोगटेजोगळेकर महाविद्यालय (रत्नागिरी) व तृतीय क्रमांक डी.बी.जे. महाविद्यालय (चिपळूण) यांनी पटकविला आहे.
स्पर्धेदरम्यान, भगवान लोखंडे यांनी तटकरे महाविद्यालयाच्या थोडक्यात प्रगतीचा आढावा घेतला. या प्रसंगी क्रीडा शिक्षक विजय तरटे, कसबे, मुंबई विद्यापीठ कोकण विभागाचे सहसचिव तथा समन्वयक श्री शशांक उपशेटे, उपाध्यक्ष पुरुषोत्तम मुळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष मंगेश देशमुख यांनी खेळाडूंना क्रीडा विषयक उत्तम मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. डॉ. तृप्ती थोरात यांनी, तर आभार प्रदर्शन डॉ. थोरात यांनी उत्तम प्रकारे केले. बक्षीस समारंभानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.







