उमेदवारांची धाकधूक वाढली

उद्या मतमोजणी; सात ग्रामपंचायतींमध्ये 86.44 टक्के मतदान

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यात सात ग्रामपंचायत निवडणुकांसाठी 18 डिसेंबर रोजी मतदान झाले होते. त्यावेळी तब्बल 86.44 टक्के मतदारांनी म्हणजे 17589 पैकी 15502 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सात ग्रामपंचायत मधील 25 मतदान केंद्रांवर मतदान झालेली ईव्हिम मधून तहसील कार्यालयातील स्ट्राँग रूम मध्ये सुरक्षित ठेवण्यात आली असून त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त आणि त्या रूम वर 24 तास सीसीटिव्ही कॅमेरे यांची निगराणी राहणार आहे. उद्या 20 डिसेंबर रोजी कर्जत तहसील कार्यालय येथे मतमोजणीला सुरुवात होणार असून दोन तासात सर्व निकाल स्पष्ठ होणार आहेत.

काल 18 डिसेंबर रोजी कर्जत तालुक्यातील उकरुळ, कळंब, कोंदिवडे, दहीवली तर्फे वरेडी, मांडवणे, वावलोळी आणि वेणगाव या सात ग्रामपंचायत मध्ये थेट सरपंच आणि तेथील ग्रामपंचायत सदस्य यांच्यासाठी मतदान घेण्यात आले. स्थानिक पातळीवर निवडणूक असल्याने तणावाखाली परंतु शांततेत मतदान पार पडले. त्यात तालुक्यात सात ग्रामपंचायत मध्ये एकूण 17589 मतदार होते, त्यापैकी 15502 मतदारांनी म्हणजे 86.44 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सात ग्रामपंचायत मधील थेट सरपंच पदासाठी 20 उमेदवार यांच्यात लढत होत असून, केवळ ग्रामपंचायतमध्ये सरळ लढत होत असून, अन्य सहा ग्रामपंचायतमध्ये तिरंगी लढत होत आहे. तर सात ग्रामपंचायतमधील 69 सदस्य पदांसाठी निवडणूक जाहीर झाली होती, मात्र त्यातील 15 सदस्य बिनविरोध निवडून आले असल्याने आता 54 सदस्यांसाठी निवडणूक झाली.

सायंकाळी साडे पाच वाजता मतदान पूर्ण झाल्यानंतर सर्व इव्हीएम मशीन पोलीस बंदोबस्तात कर्जत तहसील कार्यालयात नेण्यात आल्या. त्या सर्व मतपेट्या कर्जत तहसील कार्यालय येथील स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. त्या ईव्हीएम मशीनमधील मतांची मोजणी उद्या 20 डिसेंबर रोजी कर्जत तहसील कार्यालयात होणार आहे, अशी माहिती नायब तहसीलदार विजय राऊत यांनी दिली आहे. सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होईल आणि 12 वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

मतदानाची अंतिम आकडेवारी..
उक्रुळ झालेले मतदान 1219, 90.50टक्के, कळंब 3415, 86.90 टक्के, कोंदिवडे 1803, 88.86 टक्के, दहीवली 3012, 84.02टक्के, मांडवणे 1143, 87.32टक्के, वावलोळी 1989, 88.67 टक्के, वेणगाव 2623, 84.78 टक्के.

Exit mobile version