। खोपोली । संतोषी म्हात्रे ।
पुण्यातील सुवर्ण व्यावसायिक आणि त्याच्या मित्राला अत्याचाराच्या खोट्या केसमध्ये गुंतवून त्याचा बदनामीचा डाव आखाणार्या दिलीप साहेबराव यादव, सुमित प्रकाश साप्ते (दोघे रा.पूणे), बंटी उर्फ श्रीकांत गजानन गोंधळी (कल्याण) प्राची विजय पवार वैभव वसंत विरकर( दोघे रा. परेल मुंबई ) यांचे पितळ खालापूर पोलिसांनी तपासात उघडे केले असून पाचही जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
कामाची आणि पैशाची आवश्यकता असल्याने गैरफायदा घेत खालापूर हद्दीत आणून बळजबरी अत्याचार केल्याची तक्रार महिलेनी महालिंग शिवलिंग जंगम आणि राजाराम बबन गोगावले (रा. पुणे) या दोघांविरोधात खालापूर पोलीस ठाण्यात केली होती. गुन्ह्याच्या अनुषंगाने खालापूर पोलीसांनी महालिंग जंगम आणि राजाराम गोगावले यांना तपासाकरीता खालपूर पोलीस ठाण्यात आणले होते.
तपासात या दोघांनीही बदनामी आणि पैसे उकळण्याच्या व अडकवण्याचा डाव असल्याचे सांगितले होते. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी सखोल तपास केला असता तक्रार देणारा पीडित महिलेच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेत वरील पाच जणांनी तिला खोटी तक्रार देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले. तक्रारदार महिलेने पैशाच्या अमिषापोटी हे कृत्य केल्याचे न्यायालयात प्रतिज्ञापत्रात लिहून दिले आहे. कट राहणार्या वरील पाचही जणांना खालापूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून 24 सप्टेंबर पर्यंत न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
दिलीप साहेबराव यादव त्याच्याशी महालिंग जंगम आणि राजाराम गोगावले त्यांचे आर्थिक व्यवहार होते. दिलीपने महालिंग जंगम यांचा विश्वास संपादन करून एकूण 14 लाख रुपये किंमतीचे दागिने तयार करून घेतले होते. ते पैसे मागण्यास महालिंग गेले असता, दिलीप यादव याने ते पैसे परत न करता, आणखी 39 लाख रुपये गुंतव तुला पैसे डबल करुन देतो. जमिन घेऊन देतो, त्यानंतर सोन्याचे दुकान टाकुन त्यातुन पैसे कमवुन देतो. असे खोटे अमिष दाखवुन फसवणुक केली. महालिंग जंगम यांनी दिलीप यादव आणि त्याच्या साथीदारांनी विरोधात पुणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
पोलीस ठाणे येथे नोंदविलेल्या तक्रारी मागे घ्याव्यात, तसेच पैसे परत देण्यास लागु नये, याकरीता महालिंग जंगम यांची बदनामी करण्याच्या इराद्याने सदरचा कट रचण्यात आला होता. परंतु खालापूर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश कराड, शेखर लव्हे, पोलीस उपनिरीक्षक बजरंग राजपूत, महिला पोलीस उपनिरीक्षक काळे पोलीस हवालदार प्रसाद पाटील, निलेश कांबळे, अमित सावंत रणजीत खराडे, मनोज सिरतार त्यांच्यासह पथकाने मेहनत घेत कौशल्याने तपास करत आरोपींच बिंग फोडले.