। रोहा । वार्ताहर ।
मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास कक्षातर्फे आयोजित 19व्या ‘आविष्कार 2024-25’ या अंतरमहाविद्यालयीन संशोधन महोत्सवाचा विभागीय (रायगड) राउंड कळंबोलीतील केएलई महाविद्यालयात सोमवारी (दि.09) पार पडला. या स्पर्धेत धाटाव एमआयडीसी येथील एम.बी. मोरे महिला महाविद्यालयातील 21 विद्यार्थिनींनी 6 संशोधन प्रकल्पांचे सादरीकरण केले होते.
नव कल्पनांवर आधारित मानवी क्षमता, औषधशास्त्र, महिलांचे आरोग्य, शेअर मार्केट आदी विषयांवर आधारित हे 6 प्रकल्प पदवी स्तरातील विद्यार्थिनींनीकडून तयार करण्यात आले होते. स्पर्धेतील पोस्टर फेरीनंतर यापैकी ‘कॅसि-ब्रेव्ह’ या प्रकल्पाची पोडीयम राऊंडला निवड करण्यात आली आहे. यावेळी महिला महाविद्यालयाच्या रिसर्च सेलच्या प्रमुख प्रतिमा भोईर, दिपाली वारंगे, नरेश घाग, ममता बिंद, दर्शना शिंदे आणि ग्रंथपाल निर्मला थोरात यांनी सहभागी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.