लोखंडी बैठक व्यवस्था गेली चोरीला

नागरिकांनी केला संताप व्यक्त

। नवी मुंबई । वार्ताहर ।

महापालिकेच्या सार्वजनिक उद्याने, निवारा शेड, पदपथ या ठिकाणी पालिकेने बसवलेली लोखंडी बैठक व्यवस्था उखडून चोरून नेण्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत असून पोलीस आणि महापालिका विभागाने सर्तक राहणे गरजेचे आहे.

शहराच्या विविध भागातील सौंदर्यात, देखणेपणात, तसेच स्वच्छतेत भर घालण्याचे काम शहरातील नागरिकांसाठी असलेल्या 200 उद्यानांचा मोठा वाटा आहे. नागरिकांसाठी विरंगुळ्याचे ठिकाण तसेच चालणे, व्यायाम करणे यासाठी शहरातील सर्वच उद्यानांत दिवस-रात्र गर्दी असते. वाशी सेक्टर 4 कर्मवीर भाऊराव पाटील उद्यान, सेक्टर 7 येथील आई बाबा उद्यान, सेक्टर 4 येथील निवारा शेड, वाशी सेक्टर 1 ते 6 या विभागांतील ट्री बेल्ट यांसह वाशीमधील विविध उद्यानांत व पदपथ, मोकळ्या जागा या ठिकाणी नागरिकांची सातत्याने वर्दळ असते.

उद्यानांत पालिकेने नागरिकांना बसण्यासाठी तयार केलेली बाके, आसनव्यवस्था चक्क पळवून नेण्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेचा उद्यान विभाग व पोलीस व्यवस्था करते तरी काय असा प्रश्‍न नागरिक विचारू लागले आहेत. करोडो रुपये खर्च करून पालिकेने शहरात सुमारे 200 देखणी उद्याने निर्माण केली आहेत. विशेष म्हणजे वाशी पोलीस ठाणे असलेल्या परिसरातच पालिकेच्या उद्यानातील पदपथांवरील तसेच मोकळ्या जागांमधील लोखंडी बाके चक्क उखडून चोरून नेली आहेत. नवी मुंबई महापालिकेने शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून सीसीटीव्ही लावले आहेत ते फक्त शोभेच्या वस्तू ठरल्या आहेत का, असा संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे.

वाशी विभाग हा नेहमी गजबजलेला विभाग आहे. चोरटे चक्क पदपथावरील, निवारा शेडमधील बेंच उखडून घेऊन जातात. त्यामुळे पालिका करते काय असा प्रश्‍न आहे. पालिकेचे सीसीटीव्ही फक्त बिले अदा करण्यासाठीच लावले आहेत का, असा सवाल माजी नगरसेवकांनी विचारला आहे. वाशी विभागात व इतर ठिकाणची बाके चोरली जात आहेत. त्याबाबत पोलिसांकडेही तक्रार केली आहे.

याबाबत अधिक सतर्कता बाळगण्यात येईल. नव्याने नियुक्त केलेल्या ठेकेदारांना याबाबत योग्य ती खबरदारी घेण्याची सूचना देण्यात येईल, असे नवी मुंबई महापालिकेचे उपायुक्त दिलीप नेरकर यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version