तळा शहरातील डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्‍न गंभीर

। तळा । वार्ताहर ।
तळा शहर आणि समस्या हे जणू आता एकप्रकारे समीकरणच बनले आहे. तळा शहरालगत असलेल्या डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. तळा नगरपंचायतीने डम्पिंग ग्राऊंडची व्यवस्था मालकीच्या तळा धरणाजवळ केली आहे. शहरातील सर्व गोळा केलेला ओला व सुका कचरा एकत्रित या ठिकाणी टाकला जातो. मात्र या डम्पिंग ग्राऊंड सभोवती संरक्षक भिंत न बांधल्यामुळे मोकाट गुरे, कुत्रे व पक्षी हा कचरा संपूर्ण परिसरात पसरवित आहेत. त्यामुळे या परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे. जवळच तहसील कार्यालय असल्याने जाणार्‍या येणार्‍या नागरिकांना या दुर्गंधीचा सामना करावा लागतो. तसेच डम्पिंग ग्राऊंड शेजारीच निम्म्या शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी बोअरवेल मारण्यात आली आहे. या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी आधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध नसल्याने हा कचरा कुजून घाण पाणी जमिनीत मुरले जात आहे. त्यामुळे याचा परिणाम मानवी आरोग्यावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या डम्पिंग ग्राऊंडचे स्थलांतर शहरातील राणेचीवाडी येथे नगरपंचायतीच्या मालकी हक्क असलेल्या जागेत होणार असल्याची माहिती आहे. याबाबत मुख्याधिकारी माधुरी मडके यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, सदर डम्पिंग ग्राऊंड राणेचीवाडी येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे. मात्र ग्रामस्थांच्या विरोधामुळे हे प्रकरण जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेले आहे. यामुळे तळा शहरातील कचर्‍याची समस्या बिकट होत चालली असून काहीवेळा हा कचरा जाळला जात असल्याने मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होऊन पर्यावरणाचा प्रश्‍न निर्माण होत आहे.

Exit mobile version